टूलकिट प्रकरणी शंतनू मुळकची औरंगाबाद खंडपीठात धाव

औरंगाबाद, दि. १५ – ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी बेंगळुरू येथून दिशा रवी हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून गुन्ह्यातील शंतनू शिवलाल मुळक (रा. बीड) याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. टूलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ई मेल आयडी शंतनूचा असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत, अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी शंतनू मुळक याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. सतेज जाधव अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी अपेक्षित आहे.
दरम्यान,अटक करण्यात आलेल्या दिशावर शेतकर्‍यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करणे आणि आणखी मुद्दे समाविष्ट करून पुढे पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग हिने एक ट्विट करत शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवला होता. या ट्विटसह ग्रेटा थनबर्गने एक टूल किट ट्विट केले होते.
 सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील असलेल्या निकिता जेकब  यांच्या विरोधातदेखील अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले असून,  पोलिसांच्या कारवाईपासून बचावासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.