मुख्यमंत्री आज शहरात:महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

Image may contain: 1 person, text that says 'शिवसेना रु. 1680 कोटींची पाणी योजना -भूमिपूजन सोहळा- शुभहस्ते मा. मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शनिवार, दि. 12 डिसें. 2020 दुपारी वा. गरवारे स्टेडियम, चिकलठाणा.'

औरंगाबाद, दिनांक 11  : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते संभाजीनगरात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शनिवारी दुपारी गरवारे स्टेडियमच्या मैदानावर करण्यात येणार आहे.

१६८० कोटी रुपयांची ही एक अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे, यामुळे औरंगाबाद  शहरातील नागरिकांना व उद्योगांना मुबलक पाणीपुरवठा करणे सहज शक्य होणार आहे. या योजनेच्या पूर्ततेसाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘रस्ते विकास योजने’चे भूमिपूजन करण्यात येणार आहे.१५२ कोटी रुपयांच्या योजने अंतर्गत ​औरंगाबाद ​ शहरातील २३ रस्त्यांचे काँक्रिटिकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ५०.०४ कोटी रुपयांच्या ७ रस्त्यांचा विकास करणार आहे, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ ५१.७६ कोटी रुपयांच्या ७ रस्त्यांचा विकास करणार आहे तर औरंगाबाद महानगरपालिका ५०.५८ कोटींच्या ९ रस्त्यांचा विकास करणार आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते प्रस्तावित ‘सफारी पार्क’ प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.मराठवाड्यातील वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी मिटमिटा परिसरात ८४ हेक्टर जागेत उभारल्या जाणाऱ्या ‘सफारी पार्क’ प्रकल्पाचा एकूण खर्च १७४ कोटी इतका आहे. तब्बल १०० विविध वन्यजीव प्रजातींना या सफारी पार्कमध्ये अधिवास प्रदान केला जाणार असून यापैकी ४० टक्के प्रजाती मराठवाड्यातील, ४० टक्के प्रजाती पश्चिम भारतातील, १० टक्के प्रजाती भारतातील तर १० टक्के प्रजाती भारतीय उपखंडातील असणार आहेत. तीन टप्प्यात या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. ​ “स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन व स्मारक” या प्रास्तवित प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ​औरंगाबादशी ​ असलेले ऋणानुबंध लक्षात घेता महानगरपालिकेतर्फे सिडकोच्या एन- ६ भागात ७ हेक्टर क्षेत्रावर साहेबांचे स्मारक व स्मृतिवन विकसित करण्यात येणार आहे. ह्या प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च २१ कोटी रुपये इतका आहे. सुसज्ज वास्तू संग्रहालय, विद्युत रोषणाई हे या स्मारकाचे वैशिष्ट्य असणार आहे.