महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना शैक्षणिक संस्थांमध्ये ‘सुरक्षित आवार (कॅम्पस)’ संकल्पना राबविण्याचे निर्देश- डॉ. नीलमताई गोऱ्हे

औरंगाबाद ,४ जून /प्रतिनिधी :- पोलिस प्रशासनाचे काम चांगले असून पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यात काम करताना महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे. जिल्हा आणि शहरी भागात असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ‘सुरक्षित आवार (कॅम्पस)’ संकल्पना राबविण्यात आली पाहिजे. या अंतर्गत रगिंग, छेडछाड, विनाकारण त्रास देणे, अत्याचार अशा गोष्टींना प्रतिबंध बसू शकेल. प्रत्येक आस्थापनेत विशाखा समितीची स्थापना व्हावी. महिला दक्षता समित्यांच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थाना सोबत घेऊन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात याव्यात, दामिनी पथकांच्या पोलिसांना वारंवार रिफ्रेशर प्रशिक्षणे द्यावीत, दक्षता समित्यांच्या संवेदनशील सदस्यांना पीडित महिलांच्या संपर्कात राहायला सांगून समुपदेशन व धीर द्यावा असे निर्देश आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस प्रशासनास दिले.

पोलिस आयुक्त कार्यालयात महिला अत्याचार व त्यावरील उपाययोजना यावर आढावा बैठक श्रीमती डॉ.गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.

Image

पोलिस प्रशासनाकडून या सूचनांचे तात्काळ स्वागत करण्यात आले. येत्या १५ दिवसांत सुरक्षित आवार (कॅम्पस) संकल्पना रबिवण्यास सुरुवात होईल असे यावेळी सांगण्यात आले. या अंतर्गत शाळा महाविद्यालये आणि वसतिगृहात विद्यार्थिनींसाठी तक्रार पेट्या, तक्रार करण्यासाठी आवश्यक ईमेल आयडी लावण्यात येणार आहेत. या विषयी पाठपुरावा करण्यासाठी आता पोलिस पुढाकार घेणार आहेत. शाळेत विद्यार्थी पोलिस कडेट नेमण्यात येणार असून त्यांना पोलिस प्रशिक्षण देण्यात येईल. अंमली पदार्थांच्या सेवनाने तरुण पिढी आहारी जाऊ नये म्हणून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

सुरवातीला पोलिस आयुक्त कार्यालयातील कमांड कंट्रोल सेंटर, पोलीस नियंत्रण कक्ष, हरवलेल्या व्यक्तींचा शोध कक्षाला डॉ.गोऱ्हे यांनी भेट देत कामकाजाची माहिती घेतली.

कुटुंबातील वाढती व्यसनाधीनता, महिला अपहरण, बाल विवाह थांबविणे, कोरोना कालावधीत पती गमावलेल्या  विधवा पत्नी यांना मालमत्तेच्या कागदपत्रांचे हस्तांतरण, जात पंचायत विरोधी कायदा, ज्येष्ठ व्यक्तींसाठी कक्ष, समाजात सौहार्दता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आदींचा आढावा डॉ.गोऱ्हे यांनी घेतला. एकल महिलांचे स्वा मदत गट स्थापन करण्याची सूचना यावेळी त्यांनी केली.

प्रत्येक पोलिस ठाण्यात आयुक्तालय कार्य क्षेत्रातील गुन्हे नियंत्रणासाठी करण्यात आलेली उपाय योजना, भरोसा सेल, दामिनी पथक, महिला दक्षता समिती, विशाखा समितीमार्फत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती पोलीस आयुक्त डॉ.गुप्ता  यांनी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांना दिली. त्याचबरोबर औरंगाबाद परीक्षेत्रात महिलांवरील अत्याचारावर प्रतिबंध करण्यासाठी  केलेल्या विविध उपाययोजनांबाबतच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.प्रसन्ना यांनी दिली.

बैठकीनंतर उपसभापती डॉ.गोऱ्हे लिखित ‘समानतेकडून विकासाकडे : शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने’ या ग्रंथाची भेट डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त डॉ.गुप्ता आणि विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना यांना दिली.

यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम.प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, औरंगाबादचे पोलिसअधीक्षक मनीष कलवानिया, जालना पोलिस अधीक्षक आर. राजसुधा, बीड पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत आदींसह औरंगाबाद परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.