निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार कार्ड, वेब रेडीओचे केले उद्‌घाटन

11 वा राष्ट्रीय मतदार दिन देशभरात साजरा

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2021

आज, 25 जानेवारी 2021 रोजी नवी दिल्ली येथे आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थित 11 वा राष्ट्रीय मतदार दिन देशभरात साजरा करण्यात आला. केंद्रीय कायदा आणि न्याय, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त सुशील चंद्र, राजीव कुमार, सरचिटणीस उमेश सिन्हा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावर्षी, कोविड-19 मुळे, देशभरातील एनव्हीडी उत्सव हा प्रत्यक्ष आणि आभासी दोन्ही पद्धतीने साजरा केला जात आहे.

‘आपले मतदार सक्षम, जागरुक, सुरक्षित आणि माहितीपूर्ण बनविणे’ ही एनव्हीडी 2021 ची संकल्पना आहे. कोविड-सुरक्षित निवडणुका आयोजित करण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या (ईसीआय) वचनबद्धतेचा तसेच प्रत्येक मतदाराला माहितीपूर्ण, नैतिक आणि जागरूक करण्याचा हा पुनरुच्चार आहे.

आज दोन अनोखे डिजिटल उपक्रम सुरु करण्यात आले. आयोग डिजिटल मतदार ओळखपत्रे किंवा ई-ईपीआयसी सुरु करत आहे, यामध्ये मतदाता हेल्पलाइन मोबाइल ॲप , मतदार पोर्टल (www.voterportal.eci.gov.in) किंवा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (www.nvsp.in/) वरून लॉग इन केल्यानंतर मोबाइल फोनवर किंवा संगणकावर स्व-मुद्रणयोग्य स्वरुपात डाउनलोड करू शकतो.

राष्ट्रपतींनी आज ‘रेडिओ हॅलो वोटर्स’ ही एक 24×7 ऑनलाईन डिजिटल रेडिओ सेवा देखील सुरू केली, जी भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर मतदार जागरूकता कार्यक्रम प्रसारित करेल .