अंतरवालीत झालेल्या दगडफेकीतील मुख्य आरोपीला अटक; गावठी पिस्तुलसह दोन जिवंत काडतुस जप्त

 जालना,२५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-मराठा समजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात सुरु असलेल्या आंदोलनावर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला होता. यावेळी जमावाकडून दगडफेक झाल्याच्या देखील बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. आता या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. या दगडफेक प्रकरणात आता आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी बेदरे यांच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अंतरवलीत झालेल्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले होते.

ऋषिकेश बेदरे याच्यावर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्दशाने दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध सुरु असताना तो आपल्या २ साथीदारांसह सापडला. पोलिसांनी त्यांच्यावर ३०७ कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलेली असून न्यायालयीन  कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे‌.

काही दिवसांपूर्वी जालन्यातील अंतरवाली सराटीत पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे आदेश हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याचा खुलाला झाला होता. माहितीच्या अधीकाराखाली मागवलेल्या माहितीत जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी ही माहिती दिली आहे.

जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरु होते. यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर जोरदार दगडफेक देखील झाली होती. यामध्ये महिला देखील जबर जखमी झाल्या होत्या. यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.