ऑक्सीजन प्लँटचा जालना पॅटर्न संपुर्ण राज्यात राबवणार- पालकमंत्री राजेश टोपे

गोरगरीबांना आरोग्याच्या सेवा अधिक दर्जेदार मिळण्यासाठी जिल्हा व ग्रामीण रुग्णालयाच्या सक्षमीकरणावर भर

जालना, दि. 12 – जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब व्यक्तीला आरोग्य सेवा दर्जेदार व अधिक चांगल्या प्रमाणात तसेच जलद गतीने मिळाव्यात यासाठी जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयाच्या सक्षमीकरणावर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. जिल्हा रुग्णालयात नवीन 40 आय.सी.यु. खाटांचा शुभारंभ पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज दि. 12 सप्टेंबर रोजी करण्यात आला.

यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमती अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. संजय जगताप आदींची उपस्थिती होती

पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, जिल्ह्यातील सर्वसामान्य व गोरगरीब मोठ्या विश्वासाने जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात. या रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात मिळाव्यात यासाठी जिल्हा व ग्रामीण रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. जालना येथील कोव्हीड रुग्णालयामध्ये कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी यापूर्वीच 250 खाटा राखीव ठेवण्यात आल्या असुन यामध्ये 40 आय.सी.यु खाटांची व्यवस्था आहे. आज नव्याने 40 आय.सी.यु खाटांचा शुभारंभ करण्यात आला असुन या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये बंद्यांसाठी स्वतंत्र अशा आय.सी.यु. कक्षाची उभारणी करण्यात येत असुन या ठिकाणी नव्याने सुसज्ज असे शस्त्रक्रियागृहाचीही उभारणी करण्यात येत आहे. रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने नातेवाईकांसाठी धर्मशाळेचीही उभारणी करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

जालना पॅटर्न संपुर्ण राज्यात

जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना योग्य दाबाने व पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यादृष्टीकोनातुन सीएसआर फंडातुन 50 लक्ष रुपये खर्चुन 20 के.एल. क्षमता असलेल्या लिक्वीड ऑक्सिजन प्लँटची उभारणी करण्यात आली असल्याने रुग्णांना याचा मोठा लाभ होत असल्याचे सांगत ज्या जिल्ह्यामध्ये 200 पेक्षा अधिक खाटांची संख्या आहे अशा प्रत्येक रुग्णालयामध्ये लिक्वीड ऑक्सिजन प्लँटची उभारणी करण्याचे निर्देश त्या त्या जिल्हा प्रशासनाला देण्यात आले असल्याची माहितीही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिली.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संदर्भात श्री टोपे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मल्टीस्पेशालिटी असलेल्या रुग्णालयाची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून या योजनेत एकूण 977 पॅकेजेस असुन कोरोनावर उपचार करण्यासाठी श्वसनाच्या होणाऱ्या त्रासासंदर्भात 20 पॅकेजेस आहेत. या पॅकेजेसमध्ये न बसणाऱ्या रुग्णांना शासनाने ठरवुन दिलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम रुग्णालयांना घेता येणार नाही. रुग्णालयाकडून अधिकचे पैसे घेतले जात असतील तर त्या रुग्णालयांना पाचपट दंड आकारण्याच्या सुचनाही देण्यात आल्या असल्याचे पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

निधीतील कामे अद्यापही पुर्ण झाले नसल्याने नाराजी

सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदु मानुन शासनामार्फत अनेकविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शासन सेवेत राहुन सर्वसामान्यांची सेवा करण्याची संधी प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याला मिळते. केवळ शासकीय नोकरी न करता समाजाप्रती आपलेही काही देणे लागते या भावनेतुन सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गोरगरीबाला न्याय मिळवुन देण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत स्वयंप्रेरणेने काम करण्याच्या सुचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केल्या. घनसावंगी मतदारसंघातील जालना तालुक्यात असलेल्या 42 गावांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, आरोग्य सभापती कल्याण सपाटे, कृषी सभापती विष्णुपंत गायकवाड, समाजकल्याण सभापती श्री परसुवाले,जि.प. सदस्य सोपान पाडमुख, उपविभागीय अधिकारी श्री. सानप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री देशपांडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, घनसावंगी मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल असुन विकासाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करत जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी गोरगरीबांना शासन योजनांचा लाभ देत असताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सर्वसामान्य व्यक्ती कार्यालयात एखादे काम घेऊन आल्यास त्याला सौजन्याची वागणुक द्यावी. आपण ज्या कार्यालयात काम करतो ते कार्यालय स्वच्छ व नीटनेटकं असण्याबरोबरच आपल्या ज्ञानाचा उपयोग जनकल्याणासाठी करावा. अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसुन काम न करता तालुकास्तरवर तसेच ग्रामीण भागात आठवड्यामधुन किमान दोन वेळेस भेट देऊन त्या ठिकाणी असलेल्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

घनसावंगी मतदारसंघामध्ये असलेल्या ४२ गावातील नागरिकांना आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीकोनातुन प्रलंबित असलेली कामे प्राधान्याने पुर्ण करण्यात यावीत. ही कामे करत असताना ती गुणवत्तापुर्ण, दर्जेदार तसेच जलदगतीने पुर्ण करण्यात यावीत. यासाठी निधीची कमतरता भासत असेल तर निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगत ग्रामीण रुग्णांलयामध्ये दैनंदिन स्वच्छता राहील, याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील दिव्यांगांची माहिती घेण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात यावे. तसेच ज्यांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळालेले नसेल अशांसाठी येत्या काळात कँपचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जनतेला योग्य दाबाने व सुरळीतपणे वीजेचा पुरवठा व्हावा यासाठी ज्या ठिकाणी ट्रान्सफार्मवर ताण येत असेल त्या ठिकाणी अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसविण्यात यावेत. त्याचबरोबर शेतांमध्ये वस्ती करुन राहणाऱ्यांची मोठी संख्या आहे. परंतु या ठिकाणी सातत्याने वीजेचा पुरवठा खंडित होत असल्याने प्रत्येक फिडरला एसडीटी बसविण्यात यावेत. अनेक ठिकाणी वीज वाहुन नेणाऱ्या तारा अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. त्याठिकाणी ए.बी. केबल बसविण्यात यावेत. जालना जिल्ह्यामध्ये सोलार पार्क करण्यासाठी मोठा वाव असल्याचे सांगत गायरान जमिनीवर सोलार पार्क उभारणीसाठी प्रयत्न करण्यात यावेत. सन 19-20 मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीतील कामे अद्यापही पुर्ण झाले नसल्याने नाराजी व्यक्त करत जिल्ह्यात ज्याही एजन्सी वेळेत काम पुर्ण करत नसतील अशांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना करुन जालन्यासाठी पारेषण विभागाचे स्वतंत्र असे विभागीय कार्यालय नुकतेच मंजुर करण्यात आले असल्याची माहितीही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *