जायकवाडीत सोमवारी पाणी येणार ;अखेर नाशिकच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडले

मराठवाड्याच्या २५ दिवसांच्या लढ्याला यश

छत्रपती संभाजीनगर ,२५ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- बऱ्याच वाद आणि गोंधळानंतर अखेर नाशिकमधील धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दारणा धरणातून १०० क्यूसेकने विसर्ग करण्यात आला.हे पाणी जायकवाडी धरणात सोमवारी पोहोचणार आहे. 

मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पथकाच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले. लवकरच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून हळूहळू विसर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी 8.6 टीएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर याला झालेला विरोध आणि न्यायालयीन लढाईनंतर अखेर प्रत्यक्षात पाणी सोडण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.

शासन आदेशानुसार मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्पातून 2.10, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) प्रकल्पातून 3.36, गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी), 0.5, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून 2.643 टीएमसी असे एकूण 8.603 टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे.

मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. याच पार्श्वभूमीवर समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत वरील धरणातून जायकवाडीत 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. ज्यात नाशिक, नगरमधील गंगापूर, गोदावरी- दारणा, मुळा, प्रवरा, निळवंडे धरणातून हे पाणी सोडले जाणार आहे. मात्र, 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असला तरीही प्रत्यक्षात 5 टीएमसीच पाणी जायकवाडी धरणात येणार आहे. त्यामुळे 35 टक्के पाणी वाया जाणार आहे. तर, एकूण 5 टीएमसी पाणी आल्यावर जायकवाडी धरणाची पाणीपातळी 44 ते 45 टक्क्यांपर्यंत पाणीपातळी वाढणार आहे.