जायकवाडी धरण 15 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद दिनांक 25:जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस होत असून उर्वरीत पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जीवीत संरक्षणाच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, प्रभारी अधीक्षक अभियंता (लाभक्षेत्र विकास) राजेंद्र काळे, सहायक अधीक्षक अभियंता (लाभक्षेत्र विकास) जयसिंग हिरे, तहसिलदार चंद्रकांत शेळके (पैठण), आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अजय चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Displaying FB_IMG_1597126627028.jpg


जिल्ह्यात गेल्या दोन अडीच महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून नद्या तलावात चांगल्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी पावसाळ्याचा उर्वरीत कालावधी लक्षात घेऊन जर पावसाचे प्रमाण वाढते राहीले तर जायकवाडी धरणात निर्माण होणा-या अधिकच्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक पूर्व तयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिले. यामध्ये धरणाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात येणा-या पाण्याची आवक नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्याचे निर्देश संबंधितांना जिल्हाधिकारी यांनी दिले.
आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने इर्मजन्सी लाईट, बोट, लाईफ जाकेट, बोट मशिन, फायर सुट व इतर संबंधित जीवनसंरक्षक साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे. सर्व संबंधित यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापन चोखरित्या करण्याच्या दृष्टीने सज्ज रहावे, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी संबंधितांना यावेळी दिल्या.
जायकवाडी धरणाची पाणीसाठवण क्षमता 102.60 टीएमसी इतकी असून सध्या धरणत 87.88 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाच्या क्षमतेइतका पाणीसाठी पूर्ण झाल्यावर मंजूर धरण प्रचलन आराखड्यानुसार उर्वरीत पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. साधारणत: आतापर्यंतच्या पावसाच्या प्रमाणानुसार अंदाजे 15 ऑक्टोबर पर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यानुसार आवश्यक पुढील कार्यवाहीच्या दृष्टीने पूरक नियोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक अभियंता श्री. काळे यांनी दिली. जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत अजय चौधरी यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *