औकातीत बोला; चंद्रशेखर बावनकुळेंची राऊतांसह विरोधकांना तंबी!

नाशिक : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मालेगाव दौऱ्यावर असताना वाचाळविरांचा खरपूस समाचार घेतला. त्यांच्या विरोधात फोटो-विडिओ सोशल मीडियावर टाकणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह टीका करणा-या विरोधकांना तंबी देत ते म्हणाले की, वाचळवीरांनी औकतीत बोलावे, महाराष्ट्र संस्कारमय आहे, देव, देश, धर्म, संस्कृती जपणारा आहे. इतर काही बोलण्यापेक्षा आणि फोटो टाकून स्टंटबाजी करण्यापेक्षा राज्याच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी बोलले पाहिजे, असे म्हणत त्यांनी विरोधकांचे कान टोचले.

व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, पण एका फोटोमुळे जर कुणाची इमेज खराब करता येते असे जर एखाद्याला वाटत असेल तर ते शक्य नाही. आपण हाँगकाँगला परिवारासोबत गेलो होतो, पण त्या ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये कसिनो असतो. त्याला क्रॉस करून जाताना कुणीतरी तो फोटो काढल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ कसिनोमधील एक फोटो सोशल मिडियावर टाकला होता. त्यामध्ये बावनकुळे यांनी कसिनोमध्ये तीन तासात तीन कोटी उधळल्याचा आरोपही केला होता. त्यावर बावनकुळे यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली.

पंकजा मुंडे नाराज नाहीत

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंकजा मुडे यांच्या नेतृत्वाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्या नाराजीने विरोधकांचा काही फायदा होईल असे अनेकांना वाटते. पण पंकजाताईंच्या रक्तारक्तात भाजप आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कर्तुत्वाने उभा राहिलेल्या महाराष्ट्रात पंकजाताई कधीही नाराज राहू शकत नाहीच. खरं तर पक्ष हा मोठा आहे. पंकजाताई पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. निश्चितपणे पंकजा ताई महाराष्ट्रात आणि देशात चांगल्या लेव्हलला नेतृत्व करतील अशी अपेक्षा आहे.

महायुतीचे ४५ प्लस खासदार निवडून येतील

दरम्यान, सरकारची उत्तरे सरकार देईल, मी काही कोणावर उत्तर देणार नाही असं सांगत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी लोकसभेच्या कामासाठी आलो आहे. मी त्यावर काम करेल. सुपर वॉरियर्स लोकांच्या घरी जावून मोदींचे कार्य समजावून सांगतील. ज्यांना योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांना योजनेचा लाभ कसा देता येईल ते बघणार आहोत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. राज्यात महायुतीचे ४५ प्लस खासदार निवडून येतील, असा ठाम आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.