राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे,२३ एप्रिल /प्रतिनिधी :- महाविकास आघाडी सरकार एकीकडे सत्तेच्या माध्यमातून दादागिरी व दडपशाही करत असतानाच दुसरीकडे सत्ताधारी आघाडीला विरोध करणाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली असून भारतीय जनता पार्टी त्याबद्दल चिंता व्यक्त करते तसेच निषेध करते, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर भाजपा कार्यकर्ते मोहित कंबोज यांच्या गाडीवर काल रात्री तीनशे ते चारशे जणांच्या जमावाने हल्ला केला. त्या आधी भाजपाच्या मुंबईतील पोलखोल यात्रेच्या रथाची मोडतोड करण्यात आली व हल्लेखोर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे आढळले. अपक्ष खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यास निघाले तर त्यांच्या मुंबईतील घराबाहेर जमाव जमवून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. एखाद्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर काही पोस्ट केली तर शिवसैनिक घरात घुसून दमबाजी करतात. राज्यात हुकुमशाही आली का, आणीबाणी लागू झाली का, असे प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली आहे.

ते म्हणाले की, हनुमान चालिसा म्हणण्यात विरोध करण्यासारखे काय आहे ? एखादी व्यक्ती आपल्या घराबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यास येत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याला मानाने घरात बोलावावे. तसे नको असेल तर रोखण्यासाठी पोलिसांना बोलवावे. परंतु सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरविणे आणि त्यांनी हिंसक विरोध करणे हे अनाकलनीय आहे. मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणात पोलीस कमी पडले का, त्यांना राज्य चालविता येत नाही का, असे प्रश्न यातून निर्माण होतात.

त्यांनी सांगितले की, वीज खरेदीत कमिशन मिळावे यासाठी राज्यात कृत्रिम वीज टंचाई निर्माण करून लोडशेडिंग केले जात आहे. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाणी उपलब्ध असून शेतकरी ते पिकांना देऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार होते त्यावेळी पाच वर्षे राज्यात लोडशेडिंग बंद होते. पण आता पुन्हा कमिशनसाठी लोडशेडिंगचे कृत्रिम संकट आणले आहे. भाजपा हे सहन करणार नाही. याच्या विरोधात आम्ही उद्यापासून आंदोलन करत आहोत.

सत्ताधारी शिवसेनेच्या गुंडगिरीमुळे राज्यात अराजकभारतीय जनता पार्टीच्या आमदारांचा आरोप

May be an image of 10 people, people standing and text that says "प्रथम राष्ट्र तर पार्टी स्वतः NATION FIRST PARTY NEXT ELF LAST महार"

मुंबई :- सत्ताधारी शिवसेनेच्या दहशतीमुळे राज्यात अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या या गुंडगिरीविरुद्ध भारतीय जनता पार्टी लोकशाही मार्गाने लढा देईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतील लोकप्रतिनिधींनी शनिवारी दिला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा मुंबई अध्यक्ष आ.मंगल प्रभात लोढा, ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ.आशिष शेलार, भाजपा मुंबई प्रभारी आ.अतुल भातखळकर आदींनी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी शिवसेनेच्या दहशतीविरोधात हल्लाबोल चढविला.

श्री.दरेकर म्हणाले की, मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सुरु केलेल्या पोलखोल यात्रेवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ले चढविले. शुक्रवारी मोहित कंभोज यांच्या वाहनावर हल्ला चढविला गेला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचीही गुंडगिरी पोलीस यंत्रणा निमूटपणे पाहत बसली आहे. पोलखोल यात्रेत अडथळे आणण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ही यात्रा सुरूच राहील. मुंबईत व राज्यात सुरु असलेला राज्य सरकार पुरस्कृत दहशतवाद आजवर महाराष्ट्राने पाहिला नव्हता. या हिंसाचाराला जशास तसे उत्तर भाजपा कार्यकर्ते देऊ शकतात. मात्र आम्ही या विरोधात पोलीस आयुक्तांकडे दाद मागून लोकशाही मार्गाने लढा देऊ असेही श्री.दरेकर यांनी सांगितले.

आ.आशिष शेलार म्हणाले की, मोहित कंभोज यांच्यावरील हल्ला हे नामर्दपणाचे लक्षण आहे. कंभोज यांच्यावर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी आपणही एकटे फिरणार आहोत हे ध्यानात ठेवावे. राज्यात सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने अराजक निर्माण केले जात आहे. आम्ही कायद्याचे पालन करूच, पण या गुंडगिरीला सरकारने आवर न घातल्यास जशास तसे उत्तर देण्याचीही आमची तयारी आहे’ असा इशाराही आ. शेलार यांनी दिला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी आंदोलकांना तातडीने पकडले गेले. त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल झाले. पोलखोल यात्रेवरील हल्लेखोर व राणा दाम्पत्याच्या घरावर हल्ला करणारे मात्र मोकाट आहेत. हल्लेखोरांना वेगळा न्याय का असा सवालही त्यांनी केला. भाजपा मुंबई अध्यक्ष आ.मंगलप्रभात लोढा म्हणाले की, सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी सुरु केलेली पोलखोल यात्रा यापुढेही चालूच राहील. या दहशतवादाविरोधात आम्ही पोलीस आयुक्तांकडे दाद मागू. गृहमंत्र्यांनाही भेटण्याचा प्रयत्न करू. शिवसेनेच्या भ्रष्टाचारा विरोधातील लढाईत भाजपाला मुंबईकर साथ देतील असा विश्वास ही आ.लोढा यांनी व्यक्त केला. यावेळी खा. मनोज कोटक, प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड, योगेश सागर, तमिल सेल्वन, मनीषा चौधरी, अमित साटम, पराग आळवणी,  राहुल नार्वेकर आदी आमदार उपस्थित होते.