शेतकऱ्यांना सक्षम करण्याबरोबरच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी धोरणात बदलासाठी प्रयत्न करणार- कृषी मंत्री अब्दुल सत्तार

शेतपिकांच्या नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत

“एक दिवस शेतकऱ्यांसोबत” हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवा

जालना,१५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-   शेतकरी समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, यासाठी शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत शेतकरी आत्महत्या होणार नाहीत यादृष्टीने कृषी धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच शेत पिकांच्या नुकसानीच्या भरपाईपासुन एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावेत. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी “एक दिवस शेतकऱ्यांसोबत” हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

कृषी विभागाचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच श्री सत्तार यांनी मराठवाड्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कृषी विषयक बाबींचा आढावा घेतला. त्याप्रंसगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी मंत्री श्री. सत्तार बोलत होते.   यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित भुतेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय‍ शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद डॉ. दिनकरराव जाधव,  विभागीय कृषी सहसंचालक लातूर साहेबराव दिवेकर,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, आत्माच्या शितल चव्हाण यांची उपस्थिती होती.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की,  वातावरणामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळी परिस्थिती, पीकांवर रोगराई आदींमुळे अपेक्षित उत्पन्नापेक्षाही कमी उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई प्रत्येक शेतकऱ्याला मिळावी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी महसुल, कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश मंत्री श्री सत्तार यांनी यावेळी दिले.

शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची निकड असते.  दरवर्षी जिल्ह्यातील बँकांना खरीप व रब्बीसाठी पीकककर्जाच्या वाटपाचे उद्दिष्ट देण्यात येते. पीककर्ज घेत असताना शेतकऱ्यांना अनेक समस्या भेडसावतात. ही परिस्थिती बदलून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळावे यादृष्टीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पीककर्ज वाटपाबाबत बँक अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन शेतकऱ्यांना सहज व वेळेत पीककर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पीक लागवडीची  शेतकऱ्यांना बांधावर प्रत्यक्ष जाऊन कृषी सहाय्यकांनी माहिती द्यावी. गावा-गावात होणाऱ्या ग्रामसभांच्या माध्यमातुन बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांना पीक पेरणीची माहिती देण्यात यावी.  पेरणीसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारी बि-बियाणे, खतेही उत्कृष्ट दर्जाची व योग्य भावामध्ये दिली जातील. तसेच यामध्ये कुठल्याही प्रकारचा काळाबाजार होणार नाही, यादृष्टीने कृषी विभागाने काळजी घेण्याची सुचनाही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.

शेतीची मशागत करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा, संकटांचा सामना करावा लागतो.  शेतकऱ्यांच्या व्यथा व त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी “एक दिवस शेतकऱ्यांसोबत” हा उपक्रम संपुर्ण राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा श्री. सत्तार यांनी यावेळी केली. या माध्यमातून कृषी मंत्र्यांसह महसुल व कृषी विभागातील प्रमुख अधिकारी संपुर्ण दिवस शेतकऱ्यासोबत राहून त्यांचे प्रश्न समजुन घेतील. या उपक्रमाची सुरुवात मराठवाड्यातून करण्यात येणार असुन पावसाळी अधिवेशनानंतर हा उपक्रम राज्यभर राबविण्याच्या सुचनाही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिल्या.

यावेळी विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकरराव जाधव व साहेबराव दिवेकर यांनी औरंगाबाद व लातूर विभागात झालेल्या पेरण्या, पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, पीककर्जाचे वाटप आदी माहिती पॉवर पॉईंटच्या माध्यमातून मंत्री महोदयांना दिली.