मतदार सर्व्हेक्षणासाठी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणाऱ्या कार्यालयप्रमुखांवर गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर,२८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  मतदार सर्व्हेक्षण कार्यक्रमासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणाऱ्या कार्यालयप्रमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार महसूल तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 109 पूर्व श्रीमती पल्लवी लिंगदे यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2023 राबवण्याबाबतच्या सूचना आहेत. त्यानुसार घरोघरी जाऊन मतदारांचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. मतदार नोंदणी अधिकारी म्हणून शिक्षक, कर्मचारी यांनी त्यांचे शासकीय काम सांभाळून उर्वरित वेळेत घरोघरी जाऊन ज्या मतदारांचे वय 80 वर्षपेक्षा जास्त आहे त्यांची भेट घेणे. तसेच मयत, स्थलांतरीत, नव मतदार यांची माहिती भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु काही शाळा तसेच कार्यालयांनी या कर्मचाऱ्यांना वारंवार नोटिसा देऊन देखील हेतूपुरस्कर कार्यमुक्त केले नाही. अशा बीएलओ तसेच संबंधित कार्यालय प्रमुख व इतर यांच्यावर तहसिलदार महसूल तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 109 पूर्व श्रीमती पल्लवी लिंगदे यांनी सिटी चौक पोलीस स्टेशन येथे जाऊन गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली आहे.