आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहकसंरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :- गौरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमिवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गणेशोत्सवाच्या आधी आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा व त्यासाठी काटेकोर नियोजन करावे,असे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले.

श्री. भुजबळ हे छत्रपती संभाजीनगर येथे आले असता त्यांनी आज पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा आढावा घेतला. बैठकीस उपायुक्त पुरवठा, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, सहा. पुरवठा अधिकारी सोनाली जोंधळे, सहनियंत्रक वजनमापे सुरेश चाटे, उपनियंत्रक रमेश दराडे, सहायक नियंत्रक एस.वाय. मुंडे, डी.व्ही गावडे आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर विभागात आठही जिल्हे मिळून गौरी गणपती उत्सवानिमित्त द्यावयाच्या आनंदाचा शिधा संदर्भात माहिती देण्यात आली. विभागात अन्न धान्य वितरणाची सरासरी आकडेवारी लक्षात घेता आनंदाचा शिधा साठी 32 लाख 76 हजार 387 शिधाजिन्नस संचाची मागणी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली. विभागातील गोदामांच्या सद्यस्थितीबाबत, शिवभोजन देयकांच्या अदायगीबाबत आढावा घेण्यात आला.

श्री. भुजबळ म्हणाले की, गोदामांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून 10 लाख रुपयांपर्यंतच्या दुरुस्तीकामासाठी निधी मिळावा, अशी तरतूद करण्यात येईल.

वजनमापे नियंत्रक चत्रे यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे साखरकारखान्यांमध्ये अचूक मोजमाप व्हावे यासाठी बनविण्यात आलेल्या प्रमाणित संचालन कार्यप्रणालीची माहिती दिली.

या प्रणालीनुसार साखरकारखान्यांमध्ये वापरात असणाऱ्या वे ब्रीज मध्ये डिजीटल लोड सेल बसविण्यात यावा व या हंगामापासून प्रमाणित संचालन कार्यप्रणालीची अंमलबजावणी करावी, असे निर्देश श्री. भुजबळ यांनी दिले. तसेच विभागातील अडीअडचणींची माहितीही श्री. भुजबळ यांनी जाणून घेतली.