मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभाचे वितरण

परभणी, २७ ऑगस्ट /प्रतिनिधी :- ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज येथे अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज कल्याण कार्यालय, परभणी यांच्यामार्फत परभणी येथील अमिता रौफ बक्श यांना तृतीयपंथी म्हणून ओळखपत्र देण्यात आले. तसेच के. के. एम. महाविद्यालय मानवत येथील इयत्ता बारावीची विद्यार्थिनी प्रियंका भगीरथ अदमाने हिला राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार अंतर्गत 10 हजार रुपयाचा धनादेश, पी. डी. जैन होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या तनुजा संजय तायडे या विद्यार्थिनीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना-वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन व निवासाची सोय व्हावी म्हणून रोख रक्कम आधार संलग्न बँक खात्याद्वारे देण्यात आली आहे.

जिंतूर तालुक्यातील करवली येथील भारत स्वयंसहायता बचतगटाच्या शिल्पा रवी मानवते यांना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत वाटप करण्यात आले. वडगाव सुक्रे येथील वैशाली नाना हातागळे यांना ऊसतोड कामगार म्हणून ओळखपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

मानवत तालुक्यातील कुंभारी येथील घनश्याम मधुकर रणखांबे यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत चार एकर जिरायत शेतजमिनीचे वाटप समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले. गंगाखेड येथील गणपती यादव सवराते यांना हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जोडणारा जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनाचा लाभ म्हणून 78 लाख 51 हजार 765 रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकारी (भूसंपादन) यांच्यामार्फत देण्यात आला.

परभणी शहरातील मंगलमूर्ती नगरातील रहिवाशी श्रीपादराव प्रल्हादराव झांबरे यांना प्रधानमंत्री आवास योजना “सर्वांसाठी घरे” या योजनेअंतर्गत महानगरपालिकेमार्फत 2 लाख 50 हजार रुपये लाभाची रक्कम देऊन घरकुल बांधकाम कार्यारंभ आदेश प्रमाणपत्र देण्यात आले. विकास प्रभाकर धापसे यांना रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत नगर परिषद सेलू यांच्याकडून घराची चावी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, परभणी यांच्याकडून पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील मीना भुजंग काळे यांना स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत धनादेश देण्यात आला. तसेच परभणी तालुक्यातील लोहगाव येथील गौरी बालाजी घोरवांड यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत मोफत हृदय शस्त्रक्रिया प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाकडून वितरीत करण्यात आले.

जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर येथील राजेश कठाळू कऱ्हाळे यांना शबरी आवास योजना (ग्रामीण) योजनेअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कार्यालयाकडून 1 लाख 50 हजार अनुदानाची रक्कम देत घराची चावी दिली. जिंतूर तालुक्यातील करवली येथील तानाजी साहेबराव घाटुळ यांना स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिंतूर कार्यालयाकडून योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय अनुदानापोटी 12 हजार रुपये अनुदान देण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून साखला प्लॉट परिसर, परभणी येथील भाग्यश्री रवी गायकवाड यांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 5 हजाराचा तीन टप्यात लाभ लाभार्थीच्या बँक खात्यामार्फत देण्यात आला.

अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सोन्ना येथील मीराबाई ज्ञानेश्वर आतमवाड यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत  पाथरगव्हाण येथील अभिमान मरिबा ढवळे यांना सिंचन विहीर देण्यात आली.

जिल्हा कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सोन्ना येथील उषा रावसाहेब देशमुख यांना ट्रॅकर देण्यात आले. मानवत तालुक्यातील कोथळाच्या कमल मोतीलाल जोहरुले यांना श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजने अंतर्गत निवृत्ती वेतन मंजूर केल्याबाबतचे प्रमाणत्र देण्यात आले.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परभणी यांच्यामार्फत शहापूर येथील बाबाराव दशरथ ढवळे आणि धर्मापुरीच्या लक्ष्मण संतुकराव चट्टे यांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत अनुक्रमे 2 लाख 50 हजार  रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.

शासकीय योजनाचा लाभ मिळाल्याने आनंद; लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या गतिमान अंमलबजावणीमुळे आम्हाला शासनाच्या योजनांचा  थेट लाभ मिळाला. कुणाला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तर कुणाला घर मिळाले, कुणाला शेती तर कुणाला श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळाला. योजनेच्या लाभातून जगण्यास बळ व उभारी मिळाली, अशा भावना शेतकरी, शेतमजूर, महिला, शाळकरी विद्यार्थी, वृद्ध महिला यांनी ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमात आलेल्या लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या.

मी सेलू गावात राहतो. माझे आई वडील, पत्नी व मुले मिळून सहा लोकांचे एकत्रित कुटुंब आहे. पूर्वीपासून पत्र्याच्या घरात कुटुंबासह राहत होतो. राज्य शासनाने मला रमाई आवास योजनेतून घरकुल योजनेचा लाभ दिला आणि मी पत्र्याच्या घरातून टुमदार सिमेंटच्या घरात आलो. आज खूप आनंद झाला असून मी शासनाला मनापासून धन्यवाद देतो.

विकास प्रभाकर धापसे, सेलू जि.परभणी

मी पूर्वी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करत होतो. शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतून चार एकर शेती मिळाली. आज मी या चार एकर शेतीत कापूस व सोयाबीन पीक घेतले आहे, आम्ही घरीच संपूर्ण काम करतो, आता दुसऱ्याच्या शेतीत मजुरी करण्याची गरज नाही.

– घनश्याम मधुकर रणखांबे, कुंभारी, ता. मानवत, जि.परभणी

समाजकल्याण कार्यालयाकडून मला मिळालेल्या तृतीयपंथी ओळखपत्रामुळे जगण्याला उभारी मिळाली. आमच्यासारख्या दुर्लक्षित घटकाला कागदपत्रे मिळू लागली आहेत. त्यामुळे आम्ही समाजाच्या मुख्य प्रवाहात आलो आहोत. 

– अमिता रौफ बक्श, परभणी

मला सेलू तहसील कार्यालयाकडून श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतून लाभ मिळाला. आता महिन्याला 1500 रुपये निवृत्ती वेतन मिळेल. तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मला सहकार्य केले. शासनाचे आभार मानते.

कमल मोतीराम जोहरुले, कोथळा ता. मानवत, जि.परभणी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थांना भोजन व निवासाची सोय व्हावी म्हणून रोख रक्कम माझ्या बँक खात्यात मिळते. या योजनेच्या पैशातून मला माझे घर सोडून शिक्षण घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे मला डॉक्टर होण्यासाठी ही मदत मोठा आधार ठरत आहे.

तनुजा संजय तायडे, पी. डी. जैन होमिओ महाविद्यालय परभणी