यंदा मराठ्यांची दिवाळी नाही-मनोज जरांगे

सरकारचे काम जोरात, पण काही नेत्यांचा मराठा आरक्षणाला विरोध

२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावे जाहीर करू

मनोज जरांगे यांचा इशारा

नांदेड ,८ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- आरक्षण मिळेपर्यंत मी फटाके वाजवणार नाही, मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केली, त्यांच्या घरात अंधार असताना मी आनंद कसा व्यक्त करू, मी दिवाळी साजरी करणार नाही, असे भावनिक मत मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी व्यक्त केले.

जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार राज्यभर काम करत आहे, सरकारचे काम जोरात सुरू असल्याचे जरांगे यांनी म्हटले. तसेच ‘जे आमचे आहे, तेच सरकार आम्हाला देत आहे, आम्ही कोणाचाही घास हिरावून घेत नाही. पुरावे असतानाही ४० वर्षे मराठा समाजाचं वाटोळं झालं. नेत्यांमुळेच मराठा समाजाचं नुकसान झाले. पण आता ज्यांच्याकडे पुरावे आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जातंय. आम्हाला आरक्षण मिळतंय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही’, असेही यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितले.

‘आमच्याकडे पुरावे आहेत, त्यामुळे आरक्षण द्यावे लागेल. पुरावे आहेत तर दाखले मिळावेत हीच गावातील ओबीसींची भावना’ असल्याचेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठ्यांना पुरावे मिळू नयेत ही फक्त नेत्यांची भावना आहे, आमच्या नोकऱ्या आम्हाला मिळाव्यात, ज्यांनी आमच्या नोकऱ्या हडपल्या त्यांना काढून टाकायला हवे. आम्हाला आमच्या हक्काचं मिळायला हवं, २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावे जाहीर करू’, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

फडणवीसांच्या भेटीबाबतच्या प्रश्नावर मनोज जरांगे म्हणाले की, फडणवीस आरक्षण घेऊन आले तर त्यांच्या गळ्यातच पडतो. फडणवीस शहरात येणार आहेत. त्यांना मी कसं सांगू भेटायला या म्हणून, त्यांनी आरक्षण घेऊनच यावे, असंही जरांगे म्हणाले.

दरम्यान, आजही सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी येणार नाही. शिष्टमंडळाने पुन्हा उद्या पर्यंतचा वेळ मागितला आहे.