गंगाखेड मधील सरकारी कार्यालये कोरोनाच्या विळख्यात

गंगाखेड,१३ एप्रिल /प्रतिनिधी 

परभणी जिल्ह्यात परभणी शहरानंतर गंगाखेड शहर व तालुक्यात सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. अशातच शहरातील नगर परिषद कार्यालय, पोलीस ठाणे व आरोग्य कार्यालयेच पुरणा कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने आगामी काळात रुग्ण संख्या वाढण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे.
        गंगाखेड शहर व तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्युदर वाढल्याने सर्वसामान्यांना कोरोनाची धास्ती लागली आहे. परंतु एकीकडे धास्ती घेतलेले नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मात्र करोना बद्दलचे कुठलेच नियम पाळायला तयार नसल्याने करोनाची साखळी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जनतेची दैनंदिन कामे मोठ्या प्रमाणात असलेल्या शहरातील नगर परिषद कार्यालयात कोरोनाने धुडगूस घातला आहे. मागील अनेक महिन्यांपासून ४ ते ५ असे कर्मचारी अधिकारी हे कोरोनाने बाधित होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम व जनसंपर्कवर होत आहे.
       पोलीस ठाण्यातही पाच ते सहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. येथील रुग्णांच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातही मागील काही दिवसात अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे कळते आहे.
कोरोना महामारी फ्रंटफूटवर येऊन कार्य करणाऱ्या अनेक सरकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यास कोरोना विषयीची धास्ती दिवसेंदिवस वाढत आहे. 
     एकंदरीतच सरकारी कार्यालय तरुणाच्या विळख्यात जात असल्याने जिल्हा प्रशासनाने प्रत्येक महत्त्वाच्या कार्यालयात पन्नास टक्के उपस्थिती ची अंमलबजावणी कडकपणे करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ बिराजदारही कोरोना पॉझिटिव्ह
      मागील वर्षभरापासून ग्रामीण भागाची आरोग्य यंत्रणा चोखपणे व कर्तव्यदक्षपणे सांभाळणारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमाकांत बिराजदार यांना नुकतेच कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. मागील वर्षभरात ग्रामीण आरोग्य यंत्रणेला चांगल्या पद्धतीने हाताळत असताना तसेच मागील आठवड्यात लसीकरणाची मोहीम तालुकाभरात मोठ्या प्रमाणात राबवत असताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमाकांत बिराजदार हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. एकंदरीतच नागरिकांच्या आरोग्यासाठी दक्ष राहणाऱ्या आरोग्य विभागालाही यानिमित्ताने कोरोनाने विळख्यात घेतल्याचे बोलले जात आहे.