छत्रपती संभाजीनगरमध्ये आज रोजगार मेळाव्याचे आयोजन

देशभरात एकाच वेळी 44 ठिकाणी रोजगार मेळावा

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री संबोधित करणार

छत्रपती संभाजीनगर,२१ जुलै  / प्रतिनिधी :-  देशात एकाच वेळी 44 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या 44 ठिकाणांपैकी छत्रपती संभाजीनगरमध्येही याचवेळी आयसीएआय भवन येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 22 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवीन भरती झालेल्या उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. मेळाव्यात उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरणही करण्यात येणार आहे अशी माहिती आयकर आयुक्त किरण देशपांडे यांनी दिली.

केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तसेच या उपक्रमाला पाठिंबा देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये भरती करण्यात येत आहे. देशभरातून निवडलेले नवीन भरती, आयकर निरीक्षक, पोस्ट निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी, प्रोबेशनरी ऑफिसर, बँकांमधील सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी अशा विविध पदांवर हे उमेदवारा रुजू होणार आहेत.

एलआयसी ऑफ इंडियामधील सहाय्यक विकास अधिकारी, विभागीय लेखापाल लेखा परीक्षक, सहायक कमांडंट, कनिष्ठ लिपिक-सह-टंकलेखक, कनिष्ठ लेखा लिपिक, सहायक विभाग अधिकारी, निम्न विभाग लिपिक, ग्रामीण डाक सेवक, उपविभागीय अधिकारी, कर सहाय्यक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल, हवालदार, प्राचार्य, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, सहाय्यक कुलसचिव, सहाय्यक प्राध्यापक या पदांचाही समावेश आहे.

रोजगार मेळावा हा रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या  वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल आहे. रोजगार मेळा पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल अशी अपेक्षा असल्याचे श्री. देशपांडे यांनी प्रसिदधी पत्रकात म्हटले आहे.

नव्याने नियुक्त केलेल्यांना ‘कर्मयोगी प्रारंभद्वारे स्वतःला प्रशिक्षण देण्याची संधी देखील मिळेल, जो विविध सरकारी विभागांमध्ये सर्व नवीन नियुक्त्यांसाठी एक ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयसीएआय भवन, गट क्रमांक ७२, एमआयटी कॉलेजजवळ, बीडबाय-पास रोड, औरंगाबाद येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील उपस्थित राहणार आहेत.