देशी, विदेशी असलेल्या 60 कंपन्यांसोबत दोन लाख कोटींचे सामंजस्य करार- उद्योग मंत्री सुभाष देसाई

सीएमआयएच्या इमारत नूतनीकरणाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Displaying _DSC6486.JPG

औरंगाबाद,२८जून /प्रतिनिधी :- महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती झपाट्याने होते आहे. कोरोना सारख्या कठीणकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये उद्योग विभागाने जवळपास विविध देशी, विदेशी असलेल्या 60 कंपन्यांसोबत दोन लाख कोटींचे सामंजस्य करार केले आहेत, अशा प्रकारे राज्यात औद्योगिकरणात वाढ होत असल्याची माहिती उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

रेल्वे स्टेशन परिसरातील चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (सीएमआयए) इमारत नूतनीकरण कार्यक्रमात श्री.देसाई बोलत होते. या कार्यक्रमास आमदार अंबादास दानवे, आमदार अतुल सावे, सीएमआयचे अध्यक्ष कमलेश धूत, उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, सचिव सतीश लोणीकर, बिल्डिंग समितीचे अध्यक्ष गिरीधर संगेनेरिया, सीएमआयए, मसिआ, जिल्हा व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Displaying _DSC6434.JPG

देसाई म्हणाले, राज्यात काहीच औद्योगिक असोसिएशन आहेत, ज्यांच्या स्वत:च्या इमारती आहेत. त्यात सीएमआयएचा क्रमांक लागतो. सामाजिक भान जपत सीएमआयएने कोरोना काळात जिल्ह्याला मोठ्याप्रमाणात आरोग्य यंत्रणेला पूरक साधन सामग्री पुरविण्यासाठी पुढाकार घेतला. मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाबद्दल तळमळ असलेल्या मोरेश्वर सावे यांच्यामुळे मला सीएमआयएची ओळख झाली. औद्योगिक क्षेत्रात राज्यात औरंगाबाद आघाडीवर आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये राज्यात नमुनेदार अशी ऑरिक सिटी उभारण्यात आली आहे. निती आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत यांनीदेखील ऑरिक सिटीचे कौतुक केले. भारताचा औद्योगिक विकास ऑरिक सिटीतून दिसतो, असेही त्यांनी सांगितल्याचे श्री. देसाई म्हणाले. औरंगाबाद शहर सातत्याने उद्योग क्षेत्रात आघाडीवरच राहील. या ठिकाणचे ऑटोक्लस्टर महत्त्वपूर्ण आहे. इतरांसाठी ते मार्गदर्शकच आहे, असेही श्री. देसाई म्हणाले.

औरंगाबादबरोबरच राज्यातील इतर जिल्ह्यांचाही सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. ऑस्ट्रेलियाची वीज क्षेत्रात काम करणारी व्हिटारा कंपनी यवतमाळ जिल्ह्यात येते आहे, असेही त्यांनी सांगितले.

सीएमआयएचे उद्योग क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे आहे. उद्योग विकासासाठी सातत्याने सीएमआयएकडून अभ्यासूपद्धतीने विषयाची मांडणी करण्यात येते, जे की उद्योग विकासासाठी पूरक आहे. शिवाय सीएमआयएच्या वाटचालीस श्री. देसाई यांनी शुभेच्छाही दिल्या.

दानवे म्हणाले, औरंगाबादच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी येथील उद्योजक सातत्याने पुढे येतात. समस्या सोडवितात. शासनाकडून मोठे उद्योग राज्यात आणण्यावर भर आहे. औरंगाबादेत ऑरिक सिटीत देखील मोठे उद्योजक येणार आहेत, ही औरंगाबादच्या विकासासाठी  शासनास आनंदाची बाब असल्याचे सांगितले.

सावे म्हणाले, 1987-1988 मध्ये सीएमआयएच्या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. आता या वास्तूचे पुन:नूतनीकरण झाल्याचा आनंद आहे. येथील उद्योजक नेहमीच विकासासाठी पुढाकार घेतात. शहरात मोठ्याप्रमाणात चांगल्या रस्त्यांची निर्मिती केल्याबद्दल त्यांनी धन्यवादही दिले. तसेच चिकलठाणा औद्योगिक रस्ते सुधारण्याची मागणीही केली.

जाजू यांनी सीएमआयएच्या माध्यमातून मागील दोन वर्षात जिल्ह्यात कोरोना काळात आरोग्य सुविधा देण्यात आल्या. इमारत नूतनीकरण करण्यात आली असे सांगितले. संगेनेरिया यांनी देखील सीएमआयएच्या कामाबाबत माहिती दिली. प्रास्ताविक धूत यांनी केले. कोविड कालावधीत माणुसकी जपत आठ कोटींची मदत आरोग्य यंत्रणेला करण्यात आल्याचे सांगितले. सूत्रसंचालन लोणीकर यांनी केले. आभार जाजू यांनी मानले.

कंपन्यांचा गौरव

Displaying _DSC6484.JPG

कोविड काळात प्रशासनाला साथ देणाऱ्या उद्योजकांचा पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये युनायटेड ब्रेवरीज, हारमन फिनोकेम, ऐरॉक्स टेक्नॉलॉजी, अजंटा फार्मा  आणि कोल्हेर पॉवर आदींसह विविध दात्यांचा समावेश होता. कोविड काळात शासनाला विविध साधनसामुग्री देण्यासाठी सीएमआयएने पुढाकार घेतला. घाटी परिसरात ऑक्सीजन प्लांट उभारला, त्याचेही श्री.देसाई यांनी कौतुक केले. शिवाय सीएमआय इमारत नूतनीकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या उद्योजकांनाही सन्मानित केले. सुरूवातीला श्री. देसाई यांच्याहस्ते कोनशिला अनावरण व फीत कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.