शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय जूननंतर? सुनावणीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई ,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :-आमदार अपात्रतेवरील याचिकांवर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीचे वेळापत्रक तयार केले असून, ते सर्वोच्च न्यायालयाला सादर केले जाईल. या वेळापत्रकानुसार याचिकांवरील सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागण्यास जून २०२४ उजाडेल, अशी शक्यता वर्तवली जाते.

विधानसभा आमदार अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीचे मुद्दे १० नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात येणार असून, साक्षीदारांची उलट तपासणी २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे गटाने ऑक्टोबर महिन्यात केवळ कागदपत्रांची पूर्तता करावयाची असून, त्यानंतर साक्षीदारांची यादी सादर करावी लागेल. साक्षीपुराव्याचे काम पूर्ण झाल्यावर दोन आठवडय़ांनी अंतिम युक्तिवाद सुरु केले जाणार असल्याने याचिकांवरील निर्णय होण्यास वेळ लागणार आहे.

आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबतचे वेळापत्रक विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार शिंदे-ठाकरे गटाने एकमेकांना शपथपत्रे, कागदपत्रे आणि त्याविषयीची उत्तरे ऑक्टोबर महिन्यात द्यावयाची असून, त्यासाठी तारखा ठरवून देण्यात आल्या आहेत. या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घ्यायची की एकत्रित घ्यायची, याबाबत नार्वेकर १३ ऑक्टोबरला निर्णय देणार आहेत. या याचिकांमध्ये समाविष्ट बाबींसंदर्भातील निर्णय, घटना आणि अन्य बाबी जाहीरपणे घडल्याने आणि कागदोपत्री तपशील उपलब्ध असल्याने त्या उभयपक्षी मान्य आहेत. त्यामुळे साक्षीपुरावे नोंदविण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी केला होता. तो नार्वेकर यांनी फेटाळला.

दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात ५४ आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी ३४ याचिका सादर केल्या आहेत. 

या प्रकरणाचा निकाल काही जरी लागला तरी त्याचा राज्याच्या राजकारणावर निश्चित परिणाम होणार आहे. अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकाबाबत उद्धव ठाकरे गटाचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

६ ऑक्टोबर २०२३ : एकनाथ शिंदे गटाचे वकील उद्धव ठाकरे गटाने २३ सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रावर उत्तर/ म्हणणे दाखल करतील.

१३ ऑक्टोबर २०२३ : ‘मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे’ करण्यात आलेल्या मागणी अर्जावर दोन्ही पक्ष (ठाकरे, शिंदे) ‘ अतिरिक्त युक्तिवाद व कागदपत्रे रेकॉर्डवर आणण्याऱ्या अर्जावर दोन्ही बाजूवर लेखी म्हणने मांडतील. २३ सप्टेंबर २०२३ रोजी ठाकरे गटाने पिटीशन दाखल केली होती की, या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी एकत्र व्हावी.

१३ ते २० ऑक्टोबर २०२३ : अपात्रता सुनावणीदरम्यान विधानसभा सचिवालयात दाखल जालेल्या कागदपत्रांची आणि आदेशांची पाहणी करण्यासाठी, दोन्ही बाजूंच्या वकिलांना आवश्यक अवधी देण्यात येईल. म्हणजेच या काळात दोन्ही बाजूचे वकील ही कागदपत्रे अधिकृत पाहतील.

२० ऑक्टोबर २०२३ : ‘मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे’ २३ सप्टेंबर २०२३ रोजी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर विधानसभा अध्यक्ष निर्णय आदेश जाहीर करतील. हा अर्ज अपात्रतेबाबतच्या सगळ्या पिटीशनची सुनावणी एकत्र व्हावी या या मागणीसाठी करण्यात आला होता.

२७ ऑक्टोबर २०२३ : दाखल केलेल्या एकूण कागदपत्रांपैकी कोणती कागपत्रे अधिकृत मानावीत आणि कोणती नाकारावीत यावर दोन्ही पक्षांनी आपापले म्हणने सादर करावे. याचाच अर्थ असा की, त्या दिवशी केवळ कार्यालयीन प्रक्रिया पार पडेल. प्रत्यक्ष सुनावणीचे कामकाज होणार नसल्याचे दिसते.

६ नोव्हेंबर २०२३ : अपात्रतेचा निर्णय घेताना कोणते मुद्दे विचारात घ्यायला पाहिजेत यावर दोन्ही पक्षांनी आपले म्हणणे लिखीत स्वरुपात सादर करावे. तसेच, परस्परांना त्याच्या प्रति द्यावात.

१० नोव्हेंबर २०२३ : अपात्रतेबद्दल कोणकोणते मुद्दे गृहीत धरावेत याबाबत विधानसभा अध्यक्ष दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतील.

२० नोव्हेंबर २०२३ : झालेल्या सुनावणीमध्ये प्राथमिक तपासणी घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी आपापल्या साक्षीदारांची यादी आणि प्रतिज्ञापत्र करावेत. याचाच अर्थ त्या दिवशीही कोणतीही कारवाई न करता केवळ प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

२३ नोव्हेंबर २०२३ : या दिवसापासून उलटतपासणीस सुरुवात होईल. ज्यासाठी अध्यक्ष दोन्ही बाजूच्या वकिलांच्या सोयीनुसार तारखा देतील. शक्य झाल्यास एकाच आठवड्यात दोन वेळा उलट तपासणी घेण्यात येईल.

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण घेतल्यावर अंतिम सुनावणीसाठी दोन आठवड्यांनंतर निश्चित तारीख ठरवली जाईल. तसेच, वरील वेळापत्रकाबाबत कोणालाही विशेष अडचण नसल्यास तसेच कोणीही सुनावणी स्थगितीचा अर्ज दिला नसल्यास सर्व सुनावणी वेळापत्रकानुसार पार पडेल. मात्र, दरम्यानच्या काळात तारखांमध्ये काही बदल झाल्यास तसे कळवले जाईल, असे विधानसभा सचिवालयाने अध्यक्षांच्या वतीने आणि त्यांच्या सहीने कळवले आहे.