पंकज ठोंबरे यांच्या प्रवेशासंदर्भात राष्ट्रवादी नेत्यांशी उपयुक्त चर्चा – भाऊसाहेब पाटील ठोंबरे

वैजापूर,२१ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याची चर्चा असून पंकज ठोंबरे यांच्या प्रवेशाला राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. मात्र पंकज ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित मानला जात असून ठोंबरे यांच्या पक्ष प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्टीकडून हिरवा कंदील मिळाल्याचे समजते.

पंकज ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशा संदर्भात “आज दिनांक” शी बोलताना जिल्हयातील काँग्रेस नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे यांनी सांगितले की, माझा पुतण्या जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशासंदर्भात मी 11 सप्टेंबरला मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. पंकज बरोबर अजून किती कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत त्या सर्वांना घेऊन 18 सप्टेंबर रोजी पुणे येथे दुपारी दोन वाजेपर्यंत पाठवा  किंवा तुम्ही घेऊन या कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, जयवंतराव पाटील व मी स्वतः राहणार आहे. म्हणजे तेथे सर्वांची भेट होईल व किती कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार आहेत ते ही कळेल. म्हणून पंकज कार्यकर्त्यांसह  भेटीसाठीच पुण्याला गेलेले होते. ही भेट उपयुक्त झाली. बाकी काहीही नव्हते.असे श्री. ठोंबरे म्हणाले.