नारंगी धरणाचे दोन दरवाजे उघडले 72 क्यूसेसने विसर्ग ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणात 95 टक्के जलसाठा ठेवून नवीन आवक होणाऱ्या पाण्याचा विसर्ग 

वैजापूर,२१ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-नाशिक जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने सर्व धरणे तुडुंब भरली असून पालखेड धरणाचे अतिरिक्त पाणी वैजापूर शहरालगतच्या नारंगी धरणात सोडण्यात आले आहे. 60 क्यूसेसने हे पाणी नारंगी धरणात येत असून धरण 96.18 टक्के भरले आहे. पालखेड धरणांतून पाण्याची आवक सुरूच असल्याने या धरणातून  बुधवारी (ता.21) दुपारी 2 वाजता नारंगी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. धरणाचे दोन दरवाजे एक सेंटीमीटर उघडण्यात आले असून त्यातून 72 क्यूसेसने पाणी विसर्ग सुरू आहे. धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

गेल्या आठवडाभरापासून नाशिक जिल्हयात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. दारणा, गंगापूर, पालखेड, भाम, भावली, वाकी व अन्य धरणे काठोकाठ भरली असून या धरणांतून पाणी विसर्ग करण्यात येत आहे. पालखेड धरणातून डाव्या कालव्याद्वारे नारंगी धरणात पाणी सोडण्यात आले असून नारंगी धरणात आतापर्यंत 96.18 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.पालखेड धरणातून पाण्याची आवक सुरूच असल्याने नारंगी धरणातून पाणी विसर्ग करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला व उपविभागीय अधिकारी माणिक आहेर व आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याशी पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा केली त्यानुसार आज दुपारी 2 वाजता नारंगी धरणाचे दोन दरवाजे उघण्यात आले. गेट क्रमांक 1 व गेट क्रमांक 5 हे दोन दरवाजे उघडण्यात येऊन त्यातून 72 क्यूसेसने पाणी नारंगी नदीत सोडण्यात आले आहे.

धरणात 95 टक्के पाणीसाठा ठेवून नवीन आवक होणारे अतिरिक्त पाणी विसर्ग करण्यात येणार आहे. नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी व उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्या हस्ते विधिवत पूजा करून धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. नांदूर मधमेश्वर कालवा विभागाचे उपकार्यकारी अभियंता वाय.ए. सुराशे,उपअभियंता वाय.के. पठाण, दुय्यम अभियंता सुमित धामणे, राजीव डेरे,  सुनील खरात, राजेंद्र पाटील साळुंके, पारस घाटे आदी यावेळी उपस्थित होते.नारंगी नदीकाठच्या वैजापूर शहर, भगगांव, डवाळा, खंबाळा, किरतपुर, नगीना पिंपळगांव, कांगोणी, गोयगांव,नारायणपूर व पुरणगांव या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.