“देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयाच्या आजुबाजुलाही फिरण्याच्या कुवतीचे नाहीत”, वटहुकूम काढण्यावरुन उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबई ,४ सप्टेंबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील तीन तिघाडा सरकार निर्घृणपणे काम करत आहे. न्याय हक्कांसाठी जो कुणी रस्त्यांवर उतरेल तर आम्ही डोकं फोडू, घरात घुसून मारु. माता भगिनी, वयोवृद्ध काही बघणार नाही हाच संकेत या सरकारने जालन्याच्या घटनेतून दिला. अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली आहे. बारसूमध्ये देखील असाच अनुभव आला. तेथे देखील महिलांवर असाच लाठीचार्ज केला होता. जे सरकार स्वत:ला हिंदुत्ववादी मानतं ते वारकऱ्यांवर लाठीमार कसा करु शकतं? जालन्यातील जबाबदारी कोण घेणार सरकार पोलिसांवर जबादारी झटकणार, पोलीस म्हणणार लाठ्यांमुळे लागलं मग लाठ्यांवर जबाबदारी टाकणार का? असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

सरकार चालवण्याच्या कुवतीचे नाहीत

उद्धव ठाकरे यांनी यावेळी जालन्यात लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? एक फुल आणि एक हाफ, फडणवीस वेगळे काढले तरहीही त्यांचं काम काय चाललंय? जर पोलीस त्यांना जुमानत नसतील तर याचा अर्थ त्यांचा प्रशासनावर कंट्रोल नाही. हे सरकार चालवण्याची कुवतीचे नाहीत. यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, जर लाठीचार्ज सरकारने केला नाही तर बाहेरुन माणसे आणली होती का? बारसूत लाठीचार्ज कुणी केला? शाळकरी मुलांवर, महिलांवर लाठीचार्ज केला. हे जबाबदारी झटकण झालं. अत्यंत निर्घृणपणे वागून विचारायचं लाठी आम्ही वापरली का ?

फडणवीसांना प्रत्युत्तर

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषेदत महाविकास आघाडीमुळे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही, असा आरोप केला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडवीसांचं ज्ञान एवढं तोकडं असेल असं मला वाटत नाही. कारण हा केंद्राचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात राज्य सरकार वटहुकूम काढायला लागलं तर मला वाटत देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयाच्या आजुबाजुलाही फिरण्याच्या कुवतीचे नाहीत. यावरुन त्यांनी घटनेचा काहीही अभ्यास केला नसल्याचं सिद्ध होतं, असा टोला त्यांनी लगावला.

घटना बदलण्याचं काम चाललंय हे जे आम्ही म्हणतोय त्याची सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या बाबतीत ते करुन दाखवलं आहे. निकाल फिरवला. आता खास अधिवेशन घेऊन वटहुकूम काढावा. वटहुकूम काढला नाही असं देवेंद्र फडणवीसांना वाटत असेल तर त्यांनी वटहुकूम काढावा, असं आव्हान देखील ठाकरे यांनी फडणवीस यांना दिलं. ते पुढे बोलताना म्हणाले की, गृहमंत्र्यांनी या घटनेची जबादारी स्वीकारुन राजीनामा दिला पाहिजे. पोलीस जर मुख्यमंत्र्यांचं ऐकत नसतील तर त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी देखील माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.