वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर ?

जफर ए.खान 

वैजापूर, ७ डिसेंबर :-जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब पाटील ठोंबरे व त्यांचे पुतणे जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्यामुळे नाराज असलेले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर ते असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व त्यांच्या समर्थकांचा विरोध असूनही पक्षश्रेष्टींनी ठोंबरे काका – पुतण्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्याने माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी नाराजी व्यक्त करून सर्व पर्याय खुले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर त्यांनी संपूर्ण तालुक्यात संपर्क दौरा आयोजित करून पुढे काय करावे पक्ष सोडावा की नाही ?  पक्ष सोडल्यास कोणत्या पक्षात प्रवेश घ्यावा.  यासंदर्भात कार्यकर्ते व समर्थकांची मते जाणून घेण्यास सुरुवात केली असून माजी आमदार चिकटगावकर यांच्या संपर्क दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये प्रवेश घ्यावा असे मत या दौऱ्यात व्यक्त करण्यात आल्याचे समजते.

माजी आमदार चिकटगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू असून लवकरच ते आपल्या समर्थकांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश घेणार असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे आ.अंबादास दानवे व  सहसंपर्कपदी नियुक्ती झाल्याबद्दल ऍड. आसाराम पाटील रोठे यांचा माजी आमदार चिकटगावकर यांनी सत्कार केला व त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे त्यांच्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेशाविषयीच्या चर्चेने जोर धरला आहे.