अखेरीस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त 

केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांचा समावेश ?

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला उधाण आलं असतानाच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे म्हटले आहे. आज देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना, जुलै महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतचा निर्णय घेतील,  अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे अखेर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लवकरच निश्चित होणार असल्याचे दिसत आहे. तसेच या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र ठरल्याची माहिती आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शपथविधीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आनंद मठाला भेट दिली, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. भाजपला धन्यवाद देतो. आम्ही ५० लोकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यावेळी फडणवीस आणि त्यांची टिम आमच्या सोबत होती, असे शिंदे म्हणाले.

अजित पवार क्लिन बोल्ड

एकनाथ शिंदे म्हणाले, देवेंद्रजींना शरद पवार बोलले की विकेट घेतली मात्र पवारांनी अजित पवारांना क्लिन बोल्ड केले. हे अजित पवार यांना देखील माहित आहे. अजित पवार हे कधी विसरणार नाहीत.

एकनाथ शिंदेच निर्णय घेणार

छत्रपती संभाजीनगर येथे बैठकीबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,  राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठीच काल दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. याशिवाय आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. जुलैमध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू.

केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांचा समावेश ?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित असतानाच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. या चर्चेत केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांचा समावेश करण्याचे निश्चित झाल्याचे कळते.

एका वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपालट होणे अपेक्षित आहेत. यात काही जणांना घरी बसवले जाण्याची शक्यता असून काही जणांची खाती बदलली जाणार आहेत. या प्रक्रियेत शिवसेनेच्या एका कॅबिनेट तर एका राज्यमंत्र्याला मंत्रिमंडळात घेतले जाईल, असे बोलले जाते. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाची शासकीय पूजा केली. यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठली. रात्री त्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर या सर्व हालचालींना वेग आल्याचे बोलले जाते.