मंत्री छगन भुजबळ यांच्या टीकेला शरद पवार यांचं उत्तर

मुंबई,२९ ऑगस्ट /प्रतिनिधी :-राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीड येथे घेतलेल्या सभेनंतर अजित पवार यांच्या गटाकडून उत्तर सभा घेण्यात आली. या सभेत राज्यातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) यांनी मागच्या काही मुद्यांवरुन शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावेळी सभेत देखील गोंधळ झाला होता. शरद पवार यांच्यावर केलेली जहरी टीका कार्यकर्त्यांना रुचली नसल्याचं यावेळी दिसून आलं. तर या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत त्यांच्या पुतळ्याला जोडे मारुन पुतळ्याचे दहन केले होते.

भुजबळांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज त्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. यावेळी शरद पवार यांच्यासह पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. पवार म्हणाले की, “जर तेव्हा मी राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते.”

लढायला लागा

यावेळी बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वास दिला आहे. सर्वच कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या भूमिकेबाबत मनात कुठलाही संभ्रम ठेवू नका, आता लढायला लागा, असा संदेश शरद पवार यांनी या बैठकीत दिला आहे. अजित पवार गट माझ्यावर टीका करत आहे, पण त्यांना कोम समजवणार? त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असा सल्लाही यावेळी पवार यांनी दिला.