महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे वळवून राज्याला आर्थिक मागास करण्याचा डाव: अजित पवार

महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा

मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही?-उद्योगमंत्री उदय सामंत

वेदांता-फॉक्सकॉन गुजरातमध्ये करणार सेमीकंडक्टर निर्मिती

मुंबई ,१३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- पुण्यातील तळेगाव येथे प्रस्तावित असलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याची चाहुल लागल्यानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेते सक्रिय झाले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याप्रकरणी मंगळवारी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अजितदादांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणला जावा, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारनं यात तातडीनं हस्तक्षेप करत महाराष्ट्राबाहेर जाणारी गुंतवणूक थांबवत प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांना भेटून केली.अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. 

वेदांत ग्रुपच्या वतीनं या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यालाच प्रथम पसंती देण्यात आली होती. तळेगांव येथील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, ‘जेएनपीटी’ बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्यानं वेदांत ग्रुपनं तळेगांव येथील एक हजार एकर जागेची निवड केली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होईल. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित केला असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य आहे. गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सांमजस्य करार (एमओयू) करणार आहेत, असं कळतंय. महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होईल, अशी शक्यता अजित पवार यांनी बोलून दाखवली.

मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही?-उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई: फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो, याचे उत्तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आधी द्यावे, अशी मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी करतानाच आता तरी त्यापेक्षा दुपटीहून अधिक गुंतवणूक असलेल्या रिफायनरीच्या गुंतवणुकीत खोडा घालू नये, अशी विनंती केली आहे.
  
केवळ काहीच दिवसांपूर्वी राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले. तेव्हा फॉक्सकॉन वेदांताने सांगितले की, गुजरातने अधिक चांगले पॅकेज दिल्याने आम्ही तेथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लगेच त्यांच्याशी संपर्क साधला आणि अधिक चांगले पॅकेज देऊ केले. त्यांनी आमच्याशी चर्चाही केली. भरपूर प्रयत्न करूनही त्यांनी आधीच्या गुजरातच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरविले.
 
 
आता दोषारोपच करायचा असेल तर मग मविआच्या काळात फॉक्सकॉनला चांगले पॅकेज का देण्यात आले नाही? दोन वर्षांपासून ते गुजरातशी वाटाघाटी करीत असताना आधीच्या सरकारने त्यांचे मन का वळविले नाही? अडीच वर्षांच्या मविआच्या काळात कोणती मोठी गुंतवणूक आली? याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील. यापेक्षा कितीतरी अधिक गुंतवणूक 2014 ते 2019 या भाजपा-सेना युतीच्या सरकारच्या काळात आली होती. प्रकल्प गुजरातला गेल्याचे आम्हालाही दु:ख आहे. पण, निराश असलो तरी खचलो नाही. आम्ही सेमिकंटक्टर क्षेत्रातील अन्य कंपन्यांशी चर्चा करू आणि त्यांना महाराष्ट्रात आणू. गेल्या अडीच वर्षांपेक्षा अधिक चांगल्या उंचीवर महाराष्ट्राला निश्चितपणे नेऊ, असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.
 
असाच प्रकार गिफ्ट सिटीच्या बाबतीत झाला. नरेंद्र मोदीजी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तत्कालिन संपुआ सरकारकडून परवानगी आणली. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असूनही त्यांनी परवानगी आणली नाही आणि मग प्रकल्प गुजरातमध्ये गेला की, ओरड सुरू गेली. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता. गुजरात, कर्नाटक, दिल्ली ही तिन्ही राज्य मिळून जी बेरीज व्हायची, त्यापेक्षा अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात भाजपा-सेना युतीच्या सरकारच्या काळात यायची.
 
 
आता राज्यात पुन्हा तीच युती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात कार्यरत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे किंवा जयंत पाटलांनी फार काळजी करण्याची गरज नाही. आता वेदांताची 1.56 लाख कोटींची गुंतवणूक गेल्याबद्दल गळे काढताना नाणार रिफायनरीच्या माध्यमातून होणार्‍या 3.5 लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीत तरी खोडा घालू नका, अशी विनंती सुद्धा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

वेदांता-फॉक्सकॉन गुजरातमध्ये करणार सेमीकंडक्टर निर्मिती

अहमदाबाद : मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना यामुळे मोठा फटका बसला होता. यामुळेच सेमीकंडक्टरबाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतातील उद्योजकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. या ‘आत्मनिर्भर भारत’कडे एक पाऊल पुढे टाकत सोमवारी वेदांता समूहाने तैवानमधील फॉक्सकॉन कंपनीसोबत २० अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये अहमदाबादजवळ सुरू करणार असल्याची घोषणा केली.

वेदांत आणि फॉक्सकॉन यांनी मंगळवारी गुजरात सरकारसोबत राज्यात प्लांट स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

गुजरात सरकारने या प्रकल्पासाठी स्वस्त दरात वीज आणि अनुदान, इतर मदत जाहीर केली आहे. एका वृत्तानुसार, वेदांता समूहाने मोफत १००० एकर जमीन ९९ वर्षांसाठी मागितली होती. त्याशिवाय स्वस्त, वाजवी दरात पाणी-वीज मागितली होती, असे सूत्रांनी सांगितले.

भारतातील सेमीकंडक्टरची बाजारपेठ २०२० मध्ये १५ अब्ज डॉलर इतकी होती. ही बाजारपेठ २०२६ पर्यंत ६३ अब्ज डॉलर इतकी होण्याचा अंदाज आहे. तैवान, चीनसारख्या मोजक्याच देशांमध्ये सेमीकंडक्टरची निर्मिती केली जाते. आगामी डिजीटल तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता सेमीकंडक्टरला मोठी मागणी असणार आहे. चीन-तैवानमधील तणाव, कोरोना महामारी साथ आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला विदेशातून होणाऱ्या सेमीकंडक्टर पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.