छत्रपती संभाजीनगर महानगरात येणाऱ्या गॅस पाईपलाईनचे काम १ डिसेंबरपूर्वी पूर्ण करा – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

डॉ.कराड यांनी घेतला गॅस पाईपलाईन कामाचा आढावा

छत्रपती संभाजीनगर,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  छत्रपती संभाजीनगर महानगरातील गॅस पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, अहमदनगर, नेवासा फाटा, गंगापूर, वाळूज मार्गे महानगरात येणाऱ्या गॅस पाईपलाईनचे काम 1 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज दिले. गॅस पाईपलाईनच्या कामातील अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.कराड यांनी गॅस पाईपलाईन कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोंखडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, भारत पेट्रोलिअमचे श्री.सचदेव यांच्यासह गॅस पाईपलाईन यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

डॉ.कराड म्हणाले, आपल्या महानगरात गॅस लाईन लवकरच येणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंह पुरी यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ होणार आहे. पाईपलाईनद्वारे मिळणारा गॅस सध्याच्या सिलेंडरमध्ये मिळणाऱ्या गॅसच्या दरापेक्षा कमी दरात मिळणार आहे. हा गॅस पर्यावरणपूरक आहे. तसेच गॅस लीक झाला तर तात्काळ हवेत विरघळतो. हा गॅस 30 ते 35 टक्क्यांपर्यत स्वस्त असणार आहे. गॅस पाईपलाईनची महत्वाकांक्षी योजना पूर्ण करण्यासाठी महसूल प्रशासन, महानगर पालिका, पीडब्लुडी, नॅशनल हायवे, महावितरण यासह संबंधित यंत्रणांनी गतीने काम पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.

आपल्या महानगरात लवकरात लवकर गॅस यावा ही जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे जनतेची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी यंत्रणांना आपल्या कामात गती घ्यावी लागणार आहे. 1 डिसेंबरच्या आत काम पूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करावे.  कामात कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच गॅस पाईपलाईन कामकाजाबाबत आपण दर 15 दिवसाला आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोदावरी नदीपात्रात एचडीडी मशीनच्या माध्यमातून गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. 1300 मीटर क्रॉसिंगचे हे काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी श्री.पाण्डेय यांनी छत्रपती संभाजीनगर व जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी अहमदनगर जिल्ह्यात गॅस पाईपलाईन कामाबाबत माहिती दिली. गॅस पाईपलाईनचे काम वेळेपूर्वी पूर्ण होण्यासाठी सातत्याने आढावा घेणार असल्याचे सांगितले.