आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे-जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

छत्रपती संभाजीनगर,१९ जून / प्रतिनिधी :- नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्तहानी होऊन अनेक संकटांना सामोरे जावे लागते. गेल्या काही दिवसांपासून आपत्तीमध्ये वाढ होत आहे. अशा आपत्तीच्या प्रसंगी प्रशिक्षित मनुष्यबळ असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रशिक्षण हे महत्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले.

आज हर्सुल तलाव येथे ‘आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण औरंगाबाद’ च्या वतीने तीन दिवसीय ‘शोध व बचाव कार्य प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले आहे. या बचाव कार्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी  आस्तिक कुमार पाण्डेय  यांच्या  हस्ते झाले. यावेळी पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. भवर यांची उपस्थिती होते. सदर प्रशिक्षण 19 ते 21 जून  या कालावधीत आयोजित केले असून SDRF धुळे, यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या  प्रशिक्षणात पोलिस दल, म.न.पा, अग्निशमन विभाग, होमगार्ड हे प्रशिक्षणार्थी म्हणून धडे घेणार आहेत.

जिल्हाधिकारी म्हणाले, अनेक वर्षांपासून मानवाने निसर्गाविरोधात केलेल्या कृतीमुळे पर्यावरणात बिघाड होऊन अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. येणाऱ्या काळात अशा अनेक आपत्तींना तोंड देण्यासाठी आपल्याला सज्ज राहावे लागणार आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणे खूप महत्वाचे आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण स्थानिक पातळीवर देखील होणे आवश्यक आहे. प्रशिक्षणामुळे पूर्व नियोजन करणे आणि परिस्थिती हाताळणे अशा दोन्ही गोष्टी शिकायला मिळणार असल्याने सर्वांनी गांभिर्यांने प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया म्हणाले, अशा प्रकारचे प्रशिक्षण नियमित होणे आवश्यक आहे. अशा प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणकर्त्यांचे मनोबल उंचावते आणि त्यांना नवीन उर्जा मिळते. अशा प्रकारचे प्रशिक्षण स्थानिक पातळीवर आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.          

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. मस्के यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सुद्धा बोट ड्राईव्ह करून हर्सुल तलावाची पाहणी केली.