31 मार्चपर्यंत कोणतीही नवी योजना नाही -केंद्रीय अर्थमंत्रालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली, 
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर आलेला ताण लक्षात घेता, 31 मार्च 2021 पर्यंत कोणतीही नवी विकास योजना सुरू न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ यांनी सर्व मंत्रालये आणि शासकीय विभागांना यासंदर्भात पाठविलेल्या पत्रात उपलब्ध संसाधनाचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
 प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज, आत्मनिर्भर भारत पॅकेज आणि कोरोनाविरोधातील लढाईतील अन्य विशेष योजनांना हा निर्णय लागू होणार नाही, त्याचप्रमाणे या योजनांसाठी निधीही कमी पडू दिला जाणार नसल्याचे सीतारामन्‌ यांनी सांगितले.

प्रमुख बाबी

  • चालू आर्थिक वर्षाच्या काळात कोणतीही नवीन योजना सादर होणार नाही
  • कोरोनाविरोधी लढा मजबूत करण्यासाठी काटकसर हाच पर्याय
  • स्थगित योजनांसाठी कुठलाही निधी जारी केला जाणार नाही
  • या आदेशात इतर कोणताही विभाग स्वबळावर बदल करू शकणार नाही
  • सर्व अधिकार फक्त व्यय विभागाकडेच सुरक्षित

चालू आर्थिक वर्षात मान्यता दिलेल्या तसेच त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेल्या विकास योजनांना हा नियम लागू होणार आहे, त्यामुळे या योजना पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या व्यय विभागाने यासंदर्भातील आदेश काढला आहे.अर्थमंत्री सीतारामन्‌ यांनी सर्व मंत्रालये तसेच विभागांना पत्र पाठवून, त्यांच्या मंत्रालयासाठी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदींचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
 
अर्थसंकल्पात जाहीर झाल्या होत्या योजना
अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतरामन्‌ यांनी कृषी, ग्रामीण विकास, सिंचन आणि अन्य संबंधित क्षेत्रासाठी 2 लाख 83 हजार कोटींच्या विकास कार्यक्रमांची घोषणा केली होती. महिला विषयक कार्यक्रमांसाठी 28,600 कोटी रुपयांचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून देशात लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था बर्‍याच प्रमाणात ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम सरकारच्या महसुलावरही झाला आहे. मात्र कोरोनामुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. हे पॅकेज देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.