उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महावितरण तत्पर – डॉ.मंगेश गोंदावले

छत्रपती संभाजीनगर , ६ जून / प्रतिनिधी :- महावितरणच्या ‍विकासात उद्योजकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महावितरण नेहमीच तत्पर आहे. उद्योजकांचे वीजपुरवठा व इतर सेवांबाबतचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले यांनी दिली.

            महावितरणच्या वर्धापनदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयात प्रातिनिधीक स्वरूपात छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील उच्चदाब ग्राहकांचा सत्कार डॉ.मंगेश गोंदावले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उद्योजकांकडून त्यांनी वीजपुरवठ्याबाबतचे व इतर प्रश्न जाणून घेतले. स्थानिक समस्यांवर तातडीने मार्ग काढण्याचे तर धोरणात्मक ‍विषयांवर महावितरणचे मुख्यालय व शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात वाढत्या विजेची मागणी पाहता येत्या दशकभराचे नियोजन महावितरणने केले आहे.  पायाभूत सुविधा बळकटीकरणाचे कामही सुरू आहे. तसेच महापारेषणसोबत चर्चा करून उच्चदाब ग्राहकांचे प्रश्न सोडवू, असे डॉ.गोंदावले म्हणाले.

            यावेळी जालना येथील भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल्सचे संचालक नितीन काबरा,छत्रपती संभाजीनगर येथील स्टरलाईट टेक्नॉलॉजीजचे सहयोगी महाव्यवस्थापक बृजेश कुमार राय, रामगोंडप्पा पाटील तसेच ह्योसंग इंडिया लिमिटेडचे महाव्यवस्थापक जै स्योक आन यांचा डॉ.गोंदावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महावितरणच्या सेवांबद्दल उद्योजकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगर  परिमंडलाचे मुख्य ‍अभियंता डॉ.मुरहरी केळे, अधीक्षक अभियंता उत्क्रांत धायगुडे, सतीश खाकसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील उपस्थित होते.