नवीन प्रशासकीय संकुल तसेच पैठण येथील प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती द्या-पालकमंत्री संदिपान भूमरे 

छत्रपती संभाजीनगर , ६ जून / प्रतिनिधी :-छत्रपती संभाजीनगर शहरासाठी महत्वपूर्ण असणारी पाणीपुरवठा योजना, गरीबांसाठीची घरकुल योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान अशा अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. ह्या विकासात्मक कामांना गती देत  सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी दिले.

पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी महानगर पालिका, एमएसईबी, विभागीय क्रीडा संकुल, ब्रम्ह गव्हाण उपसा सिंचन येाजना, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान, धुळे-सेालापुर महामार्गाची दुरूस्ती अशा अनेक  विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, मनपा प्रशासक जी.श्रीकांत तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले शहरासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिकची यंत्रणा लावून जलद गतीने कामे पूर्ण करावेत. तसेच अंतर्गत पाईपलाईनचे काम गतीने करावे. योजनेची पाईपलाईन पूर्ण झाल्यावरच रस्त्यांची कामे हाती घ्यावेत तसेच काम करणाऱ्या संस्थेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन दिलेल्या काल मर्यादेत काम पूर्ण करावे. हर्सुल भागातील पाणीपुरवठ्याचे काम ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देखील संबंधितांना दिले.

मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी रामनगर तसेच सिग्मा हॉस्पिटल परिसरात वाहतूकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याबाबत पालकमंत्री यांना  सुचविले. तसेच  महापालिकेच्या नवीन इमारतीबाबत प्रस्ताव तयार करुन  संमतीसाठी पाठविणार असल्याचेही जी. श्रीकांत म्हणाले.

महानगरपालिकेची इमारत बांधताना अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करुन दर्जेदार इमारत उभारण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यानी यावेळी दिले.

नवीन प्रशासकीय संकुल तसेच पैठण येथील प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती द्या

जिल्हा प्रशासनाच्या नवीन प्रशासकीय संकुलाच्या कामाला गती द्यावी तसेच पैठण येथील प्रशासकीय इमारत आणि नाट्यगृहाचे देखील काम लवकर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी योवळी दिले.

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी शहरातील नवीन विश्राम गृहाच्या सद्यस्थितीबाबत पालकमंत्री यांना माहिती दिली. ह्या विश्रामगृहाचे काम अंतिम टप्प्यात असून नोव्हेंबर पर्यंत हे विश्रामगृह तयार होणार आहे. तसेच पैठण येथील नवीन विश्रामगृहासाठी देखील जागा अंतिम करुन लवकरच काम सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले.

घरकुल योजनेसाठी जागांची पाहणी करण्याचे निर्देश

पालकमंत्री यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला. मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. गरीबांना स्वस्तात घरे मिळावे यासाठी जास्त घरे बांधणे आवश्यक आहे. हर्सुल परिसरात  घरकुलासाठी अधिकची जागा उपलब्ध होऊ शकते. सुंदरवाडी परिसरातील आरक्षण उठवले तर मोठी घरकुल योजना होऊ शकत असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. यासंबधी महापालिका स्तरावर कार्यवाही करुन शहरातील लोक प्रतिनिधीं सोबतच्या बैठकीचे नियोजन करावे. गारखेडा परिसरात धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मारक बनविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच माहेश्वरी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या प्रतिनिधीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले.

विभागीय क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करा

विभागीय क्रीडा संकुलामध्ये सिंथेटीक ट्रॅक उभारण्यासाठी तसेच इतर सुविधांसाठी 17 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या सिंथेटीक ट्रॅकचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. खेळाडूंसाठी खरेदी करण्यात आलेले साहित्याचे वाटप करा. तसेच खेळाडू घडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करुन खेळांडूमध्ये सकारात्मक भावना वृध्दीगंत करा असे देखील त्यांनी सांगितले.

ब्रम्हगव्हाण उपसा जल सिंचन योजनेच्या उर्वरित भूसंपादनाची प्रक्रीया तात्काळ पूर्ण करा

ब्रम्हगव्हाण उपसा जल सिंचन योजनेअंतर्गत सोनवाडीसह 10 गावांच्या भूसंपादनाची प्रक्रीया पुर्ण झाली आहे. पुढील प्रक्रीया तात्काळ पूर्ण करुन गांवकऱ्यांना एका महिन्यात मावेजा देण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान सुशोभिकरणाचे कामे पूर्ण करा

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी शासन आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात आलेला आहे. उद्यानाच्या सुशोभिकरणाची काम देखील सुरू आहेत. उद्यान पूर्ववत सुरू होण्यासाठी दिलेल्या वेळेत कामे पूर्ण करा जेणेकरुन पर्यटक शहरात येतील आणि शहरांमध्ये रोजगाराच्या संधीत वाढ होईल.  उद्यानात निर्माण करण्यात येत असलेल्या सुविधांचा संपूर्ण विकास आराखडा सादर करा उद्यानाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही.  पैठण प्रवेशव्दाराबाबत देखील महावितरणणे तात्काळ कार्यवाही करुन नियोजित वेळेत प्रवेशव्दाराचे काम पूर्ण करावे. धनगाव तसेच ओवा याठिकाणी तात्काळ ट्रासफार्मर बसविण्याच्या देखील सूचना केल्या.

 सोलापुर-धुळे महामार्गाची करणार पाहणी

सोलापुर-धुळे ह्या महामार्गाची जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका आहे. सोलापुर ते औरंगाबाद रस्त्याचे काम उत्कृष्ट आहे. परंतु औरंगाबाद ते कन्नड  दरम्यान रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच पैठण रस्त्याचं देखील काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे तातडीने पूर्ण करावीत

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागांनी अपूर्ण रस्त्यांच्या कामांना गती देत  तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.