इनरव्हील क्लबकडून ७४९ विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी

छत्रपती संभाजीनगर ,२१ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय आणि इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रेयनगर येथील श्रेयस बालक मंदिर, प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय येथे “भव्य रक्त गट तपासणी शिबीर” आयोजित करण्यात आले होते.
         शिबिराचे उद्घाटन श्रेयस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्षा सुषमा मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगर अध्यक्षा डॉ. इना नाथ, प्रोजेक्ट मॅनेजर लता मुळे आणि डॉ. जयश्री देशमुख, डॉ. लता काळे उपस्थित होत्या.
          यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर लता मुळे यांनी या शिबिरासाठी पुढाकार घेऊन मार्गदर्शन करताना सांगितले की आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण कोणतेही कार्य व्यवस्थित करू शकतो. त्यामुळे सर्वांनी आपल्या स्वतःचा आणि समाजातील सर्व दुर्बल घटकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या रक्तगट माहीत असणे फार आवश्यक आहे. गरजू विद्यार्थ्यांना निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे, म्ह्णून अशा प्रकारचे आरोग्य शिबीर सात्यताने आयोजित करण्यात येतील, गरजू विद्यार्थ्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगरचा मानस आणि निर्धार आहे.  
         विद्यार्थ्यांना रक्तगट म्हणजे काय ! त्याचे प्रकार, हिमोग्लोबिनची शरीराला असलेले आवश्यकता, ते किती प्रमाणात शरीरात असावे. या तपासणीची प्रक्रिया कशी केली जाते. कोणती सोल्यूशन्स वापरली जातात. याची सर्व माहिती विद्यार्थ्यांना या तपासणी शिबिराद्वारे देण्यात आली.
            येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत या रक्तगट तपासणी शिबिरात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या एकूण ७४९ विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करून रक्तगटाची नोंदणी करून त्यांना रक्तगट कार्ड देण्यात आले.
      शिबिराच्या निमित्ताने इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगरच्या सदस्या सुनंदा पाटील यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बालऊपयोगी व बाल साहित्यांची १०० पुस्तके भेट म्हणून देण्यात आलेत.      यावेळी मुख्याधिपिका शैला धुमाळ, श्वेता पवार, इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगर सचिव विजया नानकर, माधुरी अहिरराव, मंगल चव्हाण, सुनंदा पाटील, डॉ. दिपाली आमले, डॉ. अविनाश देशमुख, डॉ. माधवी गायकवाड, डॉ. शुभांगी मराठे, डॉ. नरेश निंबाळकर, डॉ. नवीन शाहू आणि श्रेयस बालक मंदिर आणि माध्यमिक विद्यालयाची शिक्षक, विभागप्रमुख आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.