कंत्राटी भरतीचा जीआर रद्द- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

मुंबई,२० ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-राज्यातील कंत्राटी भरतीवरुन सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. यासाठी महाविकास आघाडीने आंदोलनही सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर पुराव्यांसह हल्लाबोल केला. तसेच काँग्रेस सरकारच्या काळात जे कंत्राटी भरतीसाठी जीआर काढले ते रद्द करत असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.

कंत्राटी भरती संदर्भात आमच्या सरकारवर आरोप केले जात आहेत. मात्र, हे पाप काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील असून याचे खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही यांच्या चेहऱ्यावरील बुरखा आता फाडला असून आमच्या सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असतानाच कंत्राटी पद्धतीने भरतीचा पहिला निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१० मध्ये पहिल्यांदाच या संदर्भातला जीआर काढण्यात आला, असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली. सर्वात आधी शिक्षक भरतीचा कंत्राटी जीआर अशोक चव्हाण यांनी पहिला जीआर काढला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

अशोक चव्हाण यांच्या नंतरच्या काळाज पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासंदर्भातला जीआर काढण्यात आला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कंत्राटी पद्धतीने भरती संदर्भात विरोधकांच्या सर्व प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असतानाच कंत्राटी भरतीला मान्यता

शरद पवार यांच्या आर्शीवादाने २०२१ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखिल कंत्राटी भरतीचा निर्णय झाला असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. कंत्राटी भरतीचे हे सर्व पाप, काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पाप त्यांनी करायचे आणि त्यांचे खापर आमच्या माथ्यावर फोडायचे हे, आम्हाला मान्य नसल्याचे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राची माफी मागा

या प्रकरणाचे सर्व पाप काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे आहे. त्यामुळे राज्यातील युवकांची दिशाभुल केल्याबद्दल या पक्षांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जर ते माफी मागणार नसतील तर आम्हाला त्यांना जनतेसमोर उघडे पाडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.