महारोजगार मेळावा रोजगार देण्यासोबतच उद्योजक घडविण्यासाठी उपयुक्त- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

वैजापूर येथे महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन

वैजापूर ,१७ एप्रिल  / प्रतिनिधी :- कौशल्य विकास विभागा अंतर्गत ग्रामीण भागातील युवक युवतींना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला महारोजगार मेळावा रोजगार देण्यासोबतच ग्रामीण भागात उद्योजक घडविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे मत केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज व्यक्त केले.

वैजापूर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय’ महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, आमदार रमेश बोरनारे, नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, एकनाथ जाधव, हर्षवर्धन कराड, प्रकाश घुले, बापू घडामोडे, कल्याण दांगोडे कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त सुनील सैदाने, सहायक आयुक्त सुरेश वराडे आदी उपस्थित होते.

डॉ.कराड म्हणाले, केंद्र व राज्य शासन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबद्ध आहे. ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच व्यवसायासाठी आवश्यक प्रशिक्षण, कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन, बॅंकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्धतता, यासोबतच महिला बचतगटातील महिलांनाही संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वैजापूर तालुक्यात महिला बचतगट मोठ्या प्रमाणात आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकेच्या मदतीने शासनाच्या विविध योजना असल्याचे ते म्हणाले.

ग्रामीण युवकांना रोजगाराची संधी देण्यासाठी महारोजगार मेळावा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. महारोजगार मेळाव्यासाठी गुगल लिंकमध्ये 1700 युवकांनी नोंदणी केली आहेत. आजच्या रोजगार मेळाव्यातून काहींना संधी मिळेल तर ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना गुणवत्तेच्या आधारे रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. युवकांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे असे आवाहन करुन श्री.कराड यांनी मुद्रा कर्ज योजना, स्टार्टअप योजना, यासह केंद्र शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देत लाभ घेण्याचे आवाहन केले.

आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले, आज नोकरी मिळवायची असेल तर पदवीसोबतच कौशल्य व गुणवत्ता महत्वाची आहे. युवकांनी कौशल्य व गुणवत्तेवर भर देण्याची गरज आहे. कोणताही व्यवसाय करताना त्यासाठीचे नियोजन व कष्ट अत्यंत महत्वाचे आहे. कोणत्याही उद्योग व्यवसायात कष्ट केले की निश्चित यश मिळते. केंद्र शासनानेही कौशल्य विकासावर भर दिला असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

आमदार प्रशांत बंब यांनी युवकांनी शेतीनिगडीत उद्योग तसेच प्रक्रिया उद्योगाकडे वळावे असे आवाहन करताना यासाठी आपले सर्वोतोपरी सहकार्य राहणार असल्याचे सांगितले.

स्वयंरोजगारविषयक विविध योजनांचे मार्गदर्शन

याबरोबरच बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन देण्याकरिता मेळाव्यामध्ये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त् आणि विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, यांच्यासह 9 कौशल्य विकास संस्था व जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, खादी ग्रामोद्योग, सारथी, महाज्योती, बार्टी, नेहरू युवा केंद्र, या संस्थांसह तब्बल 10 बँका यांनी सहभागी होत उमेदवारांना विविध योजनांची माहिती दिली.

25 नामांकित कंपन्यांचा सहभाग आणि 1768 पदांसाठी मुलाखती

महारोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील 25 नामांकित उद्योजकांनी सहभाग नोंदविला असून 1768 रिक्त पदे संकेतस्थळावर अधिासूचित केली आहेत. यामध्ये बीजी-लिन इलेक्ट्रिकल्स, इंडरेस व्हाऊचर इंडिया,  फ्रॅक फायबर इंडिया,  मराठवाडा ऑटो कॉम्पो, नवभारत फर्टिलायझर्स, श्रेया लाईफ, इंडिको रेमेडिज, धुत ट्रान्समिशन, रुबिकॉन फॉरमुलेशन, सुदर्शन सौर शक्ती, जस्ट डायल, अजित सिड्स, रत्नप्रभा मोटर्स, रेडिअंट इन्डुज, सद्गुरू फुड्स, संजीव ऑटो, फोर्ब्स कंपनी, लंबोदरम् मॉड्युलर, यशस्वी अकॅडमी, एक्सलेंट टिचर, जयेश व्हेंचर, एक्सेल प्लेसमेंट, ग्रामप्रो बिझनेस, लेबर नेट सर्विस, आदी कंपन्यांनी सहभाग नोंदविला असून इलेक्रिहेशिअन, वेल्डर, फिटर, मार्केट एक्सीक्युटीव्ह, इंजिनिअर, प्रोडक्शन ऑफीसर, वरीष्ठ अधिकारी, टेक्निशिअन, सर्विस ॲडव्हाझर, शिक्षक, मार्केटिंग एक्सीक्युटिव्ह, इलेक्ट्रानिक, मॅकेनिकल, आदींसह विविध पदांचा समावेश आहे. यासाठी वैजापूर तालुक्यातील अनेक युवक युवतींचा मोठा सहभाग होता.