१ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार

छत्रपती संभाजीनगर,२८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-शासन निर्णयातील तरतुदीनुसार १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांत १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण ९ जुलै २०१८ अन्वये निर्गमित करण्यात आले आहे. भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निदेशक तत्वावरील अनुच्छेद ३९ व ४१ मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा, अशी तरतूद आहे.

विभागामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व परभणी जिल्ह्यातील सर्व सहाय्यक आयुक्त यांना सार्वजनिक पदयात्रा, प्रभातफेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थाचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबिरे, चर्चासत्र तसेच परिसंवाद इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, असे  निर्देशही श्रीमती सोनकवडे यांनी दिले आहेत