समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत ग्राहक प्रबोधन करणे गरजेचे – राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे

अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत सुवर्ण महोत्सवी वर्ष उदघाटन सोहळा थाटात

छत्रपती संभाजीनगर,१९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- ‘‘स्वामी विवेकानंदांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना १९७४ मध्ये करण्यात आली. गेली ५० वर्षे देशभरात विविध प्रांतात ग्राहक पंचायतीकडून ग्राहक चळवळीचे काम सेवाभावी वृत्तीने सुरू आहे. तथापि अजूनही समाजाच्या तळागाळात ग्राहकांना आपले हक्क, कर्तव्य वा जबाबदारीची जाणीव झालेली नाही. त्यासाठी समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत प्रबोधन करणे गरजेचे आहे. आजच्या युवाशक्तीने ग्राहक चळवळ समजून घेऊन समाजाच्या दायित्वापोटी सहभाग घेतला पाहिजे. ग्राहकाला मान व न्याय मिळण्यासाठी पुरेसा संयम ठेवून, प्रसंगी झगडून आणि समर्पित भावनेने व राजकारणविरहित युवाशक्तीने या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर येथील कैलास शिल्प येथे आयोजित अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत सुवर्ण महोत्सवी वर्ष उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह धनंजय धामणे, राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे, प्रांत संयोजक धनंजय मुळे, देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ विलास मोरे, डॉ.स्मिता अवचार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरुवातीला स्वागत गीत जयश्री एकबोटे यांनी गायले. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. उपस्थित पाहुण्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी ग्राहक जनजागृतीसाठी युट्युब चॅनलच्या माध्यमातून अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा या उद्देशाने युट्युब चॅनल  सुरू करण्यात आले.

प्रास्ताविक प्रांत संयोजक धनंजय मुळे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह धनंजय धामणे यांनी ‘संघटनात्मक कार्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी सांगितले की अन्न आयोगाच्या माध्यमातून  ग्राहक संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. डॉ. स्मिता अवचार यांनी ‘ग्राहक पंचायत आणि मी’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. 

देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ विलास मोरे यांनी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कृती आराखडा सादर केला.  सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्ताने वर्षभर ग्राहक प्रबोधनासाठी महिला मेळावा, प्रबोधनपर व्याख्याने, अन्न नागरी पुरवठा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, वजन मापे निरीक्षक कार्यालय, कृषी, महावितरण आदी विभागामार्फत   ग्राहक जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले.  

या वेळी प्रांत सह संघटनमंत्री रविंद्र पिंगळीकर, प्रांत सचिव ओंकार जोशी, संगीता धारूरकर, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष नानक वेदी, प्रसिद्धीप्रमुख विजय चौधरी,लातूरचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरखले, परभणीचे जिल्हा संघटक धाराजी भुसारे, जालना जिल्ह्याचे उपाध्यक्ष बालाप्रसाद जेथलिया, बीडचे जिल्हाध्यक्ष उमेश जेथलिया, लातूर जिल्हा महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा ढेपे, संभाजीनगर च्या महिला जिल्हाध्यक्षा एड ज्योती पत्की, जालना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रामप्रसाद जेथलिया, जयश्री देशपांडे, किरण सोळंके यांच्यासह शेकडो महिला व पुरूषांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन ज्योती पत्की यांनी केले तर संगीता धारूरकर यांनी आभार मानले.