छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित दंत महाविद्यालयास विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर ,१६ जून / प्रतिनिधी :- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित दंत महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महसूल विभागानूसार ‘मराठवाडा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्कार विद्यापीठ वर्धापनदिनी दि. १० जुन रोजी नाशिक येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरुणा वनीकर (अध्यक्षा, पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळ, राष्ट्रीय विज्ञान आयोग, नवी दिल्ली), डॉ. अश्विनी जोशी (विशेष आमंत्रित सचिव, वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग), महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू ले. जन. (नि.) डॉ. माधुरी कानिटकर, प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर (संचालक ,वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय), म.आ. वि. वि. माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके, डॉ. नीलिमा क्षीरसागर, डॉ. अरुण जामकर, प्रति कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आदी मान्यवर उपस्थित होते.
या सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून निरनिराळे निकष लावण्यात आले होते. त्यात ‘नॅक’ मूल्यांकनावर आधारित पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी प्रवेश क्षमता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल, विद्यार्थी कल्याण विभागामार्फत घेण्यात आलेले विविध उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या पायाभूत व शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, अभ्यासोत्तर उपक्रम, शिक्षक यांची उत्कृष्ट कामगिरी, संशोधन, भारत सरकारकडून मिळालेले वेगवेगळे पेटंट, आय. एस. ओ. मानांकन, केंद्रीय ‘Eat Right Campus’ प्रमाणपत्र या सर्व बाबी आणि निकषांचा विचार होऊन ‘मराठवाडा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विश्वासार्ह सार्थ सेवेला मिळालेली ही पोचपावती असून भविष्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजीत मुळे यांनी दिली.
शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करून विश्वासार्ह ओळख निर्माण केली असून ‘मराठवाडा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्कारामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी अधिक वाढली असून सांघिक प्रयत्नातून ती निश्चितच पूर्ण करू. असा विश्वास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शैक्षणिक स्तरावर महाविद्यालयाची डॉ. यशश्री देशमुख यांनी दोन वेळेस सुवर्णपदक पटकावले. अस्मिता शिंदे, वर्षाराणी नागरगोजे, गीतांजली भोसले, मोसमी सय्यदा या विद्यार्थिनी विद्यापीठाच्या शैक्षणिक क्रमवारीत उच्च स्थान पटकावले आहे. तसेच महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्योती मगरे यांना त्यांनी केलेल्या संशोधनासाठी भारत सरकारकडून २०१९ ला पेटंट प्रदान केले आहे.
दंत महाविद्यालय सन १९९१ यावर्षी सिडको येथे ५० विदयार्थी क्षमतेने सुरु होऊन २००१ ते २००२ मध्ये दंत महाविद्यालय, कांचनवाडी येथे भव्य परिसरामध्ये स्थलांतरित झाले. २००३ मध्ये विदयार्थी क्षमता ५० वरून १०० ची मान्यता शासनांकडून मिळाली आहे. २००७ मध्ये तीन विषयात पदव्यूत्तर अभ्यासक्रम सुरु झाले. २०१२ मध्ये त्यात आणखी ०३ विषयाची भर पडली, सध्या सहा विषयात पदव्यूत्तर अभ्यासक्रम सुरु आहे. २०१८-१९ ला पी. एचडी अभ्यासक्रम होऊन सहा विषयात सुरु करण्यात आले. महाविद्यालयास शैक्षणिक ऊर्जा व पर्यावरनाचे आय. एस. ओ. मानांकन प्राप्त झालेले असून फेब्रुवारी २०२३ मध्ये दंत महाविद्यालयास शैक्षणिक स्तरावर ‘नॅक’ अधिस्वीकृती बी प्लस (B+) (CGPA 2.55 ) मूल्यांकन मिळाले आहे. तसेच दंत रुग्णालयात येणाऱ्या रूग्णांना कमी दरात तत्पर सेवा दिली जाते. मराठवाड्यातील रुग्ण मोठया प्रमाणात या सेवेचा लाभ घेतात.
या पुरस्कारासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजित मुळे, सचिव श्री. पद्माकर मुळे, विश्वस्त श्री. समीर मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांचा बळकट पाठिंबा मिळाला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. लता काळे, उप-अधिष्ठाता डॉ. विश्वास कदम, डॉ. ज्योती खेडगीकर, डॉ. संजय सरोदे, डॉ. अमृता बनसोडे, डॉ. श्रद्धा भंडारी व सर्व विभागप्रमुख शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

अथक प्रयत्न आणि परिश्रमाचे हे यश-पद्माकरराव मुळे

दंत महाविद्यालयास ‘मराठवाडा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्कारामुळे महाविद्यालयाकडून दिल्या जात असलेल्या गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह शैक्षणिक दर्जावर शिक्कामोर्तब झाले आहे, या पुढील काळात रुग्ण आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आमच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्न आणि परिश्रमाचे हे यश असल्याचे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव श्री. पद्माकरराव मुळे यांनी सांगितले.