मराठवाड्याच्या शाश्वत विकासाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर,१६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठवाड्याच्या विकासाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून छत्रपती संभाजी नगरची ओळख आहे. छत्रपती संभाजी नगरसह मराठवाड्यातील पायाभूत सुविधांसाठी शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिला आहे. मराठवाड्याच्या शाश्वत विकासाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

शहरातील वंदे मातरम सभागृहात हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्या विविध विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री अजित पवार, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, खासदार  सय्यद इम्तियाज जलील,आमदार  सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे,  आमदार संजय शिरसाट, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार नारायण कुचे, आमदार राजू नवघरे, आमदार बाळसाहेब आजबे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाइतकाच प्रखर लढा हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी लढला गेला. स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन अनेक स्वातंत्र्य सेनानींच्या त्यागाने, कष्टामुळे तसेच त्यांच्या बलिदानामुळे निजामाच्या जुलमी राजवटीतुन हैदराबाद मुक्त होऊन स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाची जाणीव प्रत्येकाने ठेवण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याचे एक वेगळे वैशिष्ट आहे. त्यात छत्रपती संभाजी नगरचा इतिहास प्रेरणादायी आहे. मराठवाड्याचे मध्यवर्ती केंद्र म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजी नगर शहराने शैक्षणिक, आरोग्य, औद्योगिक, पर्यटन यासह सर्वच क्षेत्रातील विकासामध्ये भरारी घेतली आहे.  राज्य शासनाने मराठवाड्याच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले असुन गतकाळात पाणी पुरवठा योजनेसाठी 2 हजार 774 कोटी, रस्त्यांच्या कामासाठी 500 कोटी, पैठण येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

मराठवाड्यातील जनतेला पाणी, वीज, रस्ते यासारख्या मुलभूत सुविधांसाठी शासनाने निधी देण्याचे काम केले असल्याचेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याने वॉटरग्रीड प्रकल्प तसेच नद्यांचे वाहुन जाणारे पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी काम करण्यात येत आहे. नद्यांचे वाहुन जाणारे पाणी वळविण्यासाठीच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. त्याचा डीपीआर बनविण्याचे काम सुरु आहे. केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असुन राज्याच्या विकासामध्ये केंद्र सरकारमार्फत भरीव तरतूद करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, मराठवाड्यात अनियमित पर्जन्यमानामुळे उदभवणाऱ्या समस्येवर जलसंधारणाच्या माध्यमातून कायमस्वरुपी तोडगा काढण्याबरोबरच सिंचनाचे ग्रीड, लहान लहान साखळी धरणांची निर्मिती, वातावरण अनुकूल पिकांची शिफारस, कोल्ड स्टोरेजेस तयार करुन शेतीमालाचे मूल्यवर्धन करण्यावर भर देण्यात येत आहे. शाश्वत सिंचनाची हमी असलेल्या जलयुक्त शिवार अभियाना टप्पा 2 प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी मराठवाड्यात उद्योग स्थापन करण्यासाठी उद्योगाला विशेष सवलती देण्यात येत आहेत. मराठवाडा एज्युकेशन व मेडीकल हब बनविण्यासाठीही चालना देण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.

महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक उपक्रम, योजना राबविल्या आहेत. शासनाने अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे काम केले. असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, महिलांना एसटीत ५० टक्के सवलत, ज्येष्ठांना मोफत प्रवास, शेतकऱ्यांना नमो सन्मान योजनेत वर्षाला १२ हजार रूपयांची मदत दिली जात आहे. एक रूपयात पीक विमा क्रांतीकारी योजना आहे. शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना दिली आहे. नैसर्गिक आपत्ती पूर्व सूचना देणारे सॅटेलाईट शासन उभारणार आहे. यावर्षी पाऊस कमी पडला ही वस्तुस्थिती आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. जी-२० परिषदेत भारताचा ठसा उमटविण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. शासनाने ३५ जल सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यामुळे ८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.         

हैदराबाद मुक्ती संग्राममध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान, त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे त्यांचा पुतळा उभारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याबरोबरच शहरातील सुमारे ३०० वर्ष पूर्वीच्या तीन पूलांच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आपले सण, उत्सव पुढे नेण्याचे काम मंडळामार्फत करण्यात येते. राज्यातील सण, उत्सव गुण्यागोविंदाने व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करत गणेश मंडळांना पुढील पाच वर्षासाठी परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचेही मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, हैदराबाद मुक्तिसंग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्षाची ही सांगता असली तरी हा शेवट नसून शतक महोत्सवी वर्षाकडे विकसित मराठवाड्याची सुरुवात आहे. या निमित्ताने होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणाऱ्या निर्णयामुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल. यानिमित्ताने होणाऱ्या निर्णयांची प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने कामे करुन मार्गी लावावीत. मराठवाड्यात लघु मध्यम मोठे प्रकल्प, जलसंधारणाचे प्रकल्प राबवून लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याच्या प्रयत्न आहे. समुद्राकडे वाहून जाणारे पावसाचे पाणी गोदावरी खोऱ्याकडे वळवून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

गुजरातकडे जाणारे अतिरिक्त पाणी राज्यासह गोदावरी नदीच्या खोऱ्यात वळवून येत्या काळात मराठवाड्याला उपयोग करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. नदीजोड प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचा पर्यंत करण्यात येत आहे.  येत्या काळात असे १०४ प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असुन राज्यातील अवर्षणप्रवण भागासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. 

राज्यात रस्ते, रेल्वे, गर्दीच्या ठिकाणी मेट्रो, प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ झाले पाहिजे, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, शेतीला पाणी, शेतमालाला चांगला भाव पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात गुंतवणूक वाढवून तरुणांना रोजगार , महिलांना समान संधी, विकासामध्ये त्यांना वाटा मिळाला पाहिजे, त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे यासाठी काम करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठवाडाच्या मातीने संत, महात्मा, समाजसुधारक, साहित्यिक, कलावंत, विचारवंत दिले याचा रास्त अभिमान असल्याचे सांगत मराठवाड्यात सांस्कृतिक, अध्यात्मिक, लेणी, भुईकोट किल्ले, पारंपरिक लोककला, खाद्यसंस्कृती तसेच पाहुण्याचा आदरातिथ्य करणारा भाग असून या पर्यटन स्थळावर लक्ष केंद्रित करुन पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा काम करण्यात येत आहे.

 मराठवाड्याचा कल्याणासाठी, समृद्धीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान, त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे पुतळा उभारण्याची व त्याचबरोबर शहरातील सुमारे ३०० वर्ष पूर्वीच्या तीन पूलांच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची विनंतीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे  केली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महापालिका आयुक्त जी. श्रीकांत  म्हणाले, छत्रपती संभाजी नगर शहरात विविध विकास कामे सुरु आहेत. आगामी काळात सुमारे २ हजार कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित आहे. त्यानुसार कामे करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा व देवळाई परिसरातील मलनि:स्सारण योजनांचे ई भूमीपुजन, हर्सूल येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राचे ई लोकार्पण, महानगरपालिकेच्या एज्युकेशन कंट्रोल रूमचे उद्घाटन, येथील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ, नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी आकांक्षिक स्वच्छतागृह बांधण्याच्या भूमिपूजन, कांचनवाडी येथील अग्निशमन केंद्र इमारतीचे लोकार्पण, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान, बोटॅनिकल गार्डन येथील विकास कामे, महानगरपालिकेने खरेदी केलेल्या विविध यंत्रासामुग्रीचे लोकार्पण, हिंदू-हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोर्कापणही यावेळी करण्यात आले.

            सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कॉफी टेबल बुक, गॅझेटियर, डॉक्युड्रामा फिल्म व पोस्टल कव्हर विमोचनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.