वैजापूर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाची दबंगगिरी ; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची नेमप्लेट तोडून फेकली

निलंबनासाठी भीमसैनिकांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

वैजापूर ,२३ एप्रिल  / प्रतिनिधी :- रात्रीच्या पेट्रोलिंग दरम्यान वैजापूर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षकाने रस्त्यावर दबंगगिरी करत चक्क दुचाकीवर असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची नंबर प्लेट हातानी तोडून कचऱ्यात फेकल्याने तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. शुक्रवारी (ता.21) दुपारी घटनेच्या निषेध करण्यासाठी भीमसैनिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत संबधीत पोलिस उपनिरिक्षकाला निलंबित करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.

पवनसिंग राजपूत असे या पोलिस उपनिरिक्षकाचे नाव आहे. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास शहरातील गंगापूर चौफुलीवर गोल्डन ट्रेडिंग कंपनीसमोर अंकुश कारभारी पठारे यांची दुचाकी उभी होती. यावेळी  पेट्रोलिंग असलेले वैजापूर पोलीस ठाण्यातील यावेळी पोलिस उपनिरीक्षक  पवनसिंग राजपूत यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची नंबर प्लेट हाताने तोडून कचऱ्यात फेकल्याचा आरोप करत तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यानी शुक्रवारी वैजापूर पोलिस ठाण्यासमोर एकत्र येवून ठिय्या दिला व पोलीस उपनिरीक्षक राजपूत यांना तातडीने निलंबित करा नसता तीन दिवसानंतर पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी महक स्वामी व पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

पोलीस अधीक्षक कलवानिया यांच्याकडे तक्रार

या घटनेनंतर आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते यांनी थेट पोलिस अधीक्षक यांना फोन लावून पोलीस उपनिरीक्षक राजपूत यांच्याविरुद्ध तातडीने एक्शन घ्या अन्यथा पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करण्यात येईल असा अल्टीमेटम दिला. दरम्यान, घटनेनंतर जेव्हा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते ठाण्यात जमा झाले त्यावेळी राजपूत पोलिस ठाण्यात नव्हते.अशी चर्चा आहे.