वीरगाव ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी

वाहनातील वाळूची हेर पोलिस अधीक्षकांचा दणका

वैजापूर,२४ जुलै /प्रतिनिधी :-कर्तव्यात कुचराई केल्याचा ठपका ठेवून पोलिस अधीक्षकांनी तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांची औरंगाबाद येथील पोलिस मुख्यालयात तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. दरम्यान या तिघांचीही पोलिस उपअधीक्षक कार्यालयात चौकशी सुरू होती. वाळूच्या पकडलेल्या वाहनात मखलाशी केल्यामुळे तिघांनाही हे प्रकरण चांगलेच भोवले.    

वीरगाव पोलिस ठाण्यातील हवालदार राहूल रंगनाथ थोरात, पोलिस नाईक किशोर संतराम आघाडे व पोलिस नाईक परमेश्वर कचरू चंदेल अशा उचलबांगडी करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मे महिन्यात वैजापूरच्या प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास तालुक्यातील सावखेडगंगाजवळ वाळूचे वाहन पकडून ते तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाणेप्रमुखांकडे सुपूर्द केले होते. त्यानंतर पथकाने पकडलेल्या वाहनातील वाळूचे मोजमाप करण्याचे फर्मान वीरगाव पोलिसांना सोडले. वाळूच्या वाहनाच्या मालकाचे आणि वीरगाव पोलिसांचे लागेबांधे असल्यामुळे वाहनाचे वजन काट्यावर मोजमाप करण्यापूर्वी पोलिसांनी मखलाशी केली. वाहन काट्यावर घेऊन जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यातील वाळू कमी केली अन् त्यानंतर मोजमाप करण्यात आले. दरम्यानच्या काळात उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने वजनाबाबत अहवाल वीरगाव पोलिसांना मागितल्यानंतर त्यांनी तो अहवाल पथकाकडे सादर केला खरा. परंतु या अहवालात पथकाला काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला. त्यामुळे पथकाने पोलिसांकडे मोजमापाची पावती मागितली. पावती मागितल्यानंतर वीरगाव पोलिसांची पाचावर धारण बसली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा वजन काट्यावर जाऊन वाहनाचे मोजमाप करावयाचे ठरविले. परंतु यावेळी त्यांनी वाहनाचे वजन करण्यापूर्वी वाहनात आणखी वाळू भरून थेट वजन काट्यावर गेले. यावेळी वाहनाचे वजन पहिल्या तुलनेत जास्त भरले. तसाही अहवालही त्यांनी पथकाकडे सादर केला. पहिल्या आणि दुसऱ्यावेळी वाहनाच्या वजनात आलेली तफावत पाहता वरिष्ठांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही.  पोलिसांनी पहिली चूक झाकून ठेवण्यासाठी आणखी दुसरी चूक करून ठेवली अन् इथेच गफलत होऊन ते अलगद जाळ्यात सापडले. प्रकरण आपल्यावर शेकू नये म्हणून तत्कालीन ठाणेप्रमुखांनी हा सर्व उपद्व्याप संबंधित तिघांनी केल्याची नोंद करून अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सोपविला. दरम्यान पोलिस अधीक्षकांनी कर्तव्यात कुचराई केल्याचा ठपका ठेवून प्राथमिक चौकशी प्रस्तावित करण्यात आली. त्यानुसार पोलिस उपअधीक्षकांमार्फत तिघांचीही चौकशी करण्यात येऊन त्यांची 21 जूलै रोजी औरंगाबाद येथील पोलिस मुख्यालयात तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. अधीक्षकांच्या या दणक्यामुळे  पोलिस दलातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 
तत्कालीन ठाणेप्रमुखांचे काय ?
पोलिस अधीक्षकांनी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कुचराईचा ठपका ठेवून त्यांना मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले खरे. परंतु वीरगावचे तत्कालीन पोलिस ठाणेप्रमुख विजय नरवडे यांच्याविरुद्ध काय कारवाई झाली? हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. पोलिस उपअधीक्षकांनी त्यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या ‘हेराफेरी’ प्रकरणात तत्कालीन ठाणेप्रमुखांचीच महत्वाची ‘भूमिका’ आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिस अधीक्षक काय ठपका ठेवतात ? हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.