चित्रा वाघ यांनी घेतली थोरे कुटुंबियांची भेट,पोलिस संरक्षण देण्याची मागणी

वैजापूर,९ डिसेंबर /प्रतिनिधी :- भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथील थोरे कुटुंबियांची भेट घेतली. प्रेमविवाह केल्याच्या कारणावरुन थोरे कुटुंबातील किर्ती उर्फ किशोरी (२१) या सुनेचा तिच्या आई व भावाने कोयत्याने निघृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभुमीवर भाजपाच्या चित्रा वाघ यांनी किशोरी यांच्या कुटुंबियांची सहानुभुतीपुर्वक भेट घेऊन संवाद साधला.

संपुर्ण घटनेचा तपशील जाणुन घेतल्यानंतर ही घटना अतिशय दुर्देवी असुन एव्हढी भयंकर घटना घडलेली असतानाही थोरे कुटुंबियांना पोलिस संरक्षण मिळाले नाही याबाबत खेद व्यक्त केला. त्यांनी थोरे कुटुंबियांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी उपविभागिय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती यांच्याकडे केली. यावेळी मत किशोरी हिचे पती अविनाश यांनी विरगाव पोलिसांच्या कामाबाबत वाघ यांच्याकडे फिर्याद मांडली‌. अविनाश यांनी त्यांचे विवाह प्रमाणपत्र विरगाव पोलिसांकडे सादर केले आहे. पंचनाम्याची मागणी केली असता ” आता तुझी बायको मेली, तुला याची काय आवश्यकता ? असा प्रश्न पोलिसांनी केला असा आरोप अविनाश यांनी केला. याबाबत उपविभागिय पोलिस अधिकारी प्रजापती यांनी विरगाव ठाणे प्रमुखांना जाब विचारावा व योग्य कार्यवाही करावी अशी मागणी वाघ यांनी केली.

नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांच्या निवासस्थानी भेट

आज भा.ज.पा. प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी वैजापूर तालुक्यातील घडलेल्या हत्याकांडच्या पार्श्वभुमीवर आज वैजापूरच्या नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी संभाजीनगर जिल्हा सरचिटणीस निलेश पारख, भाजपा वैजापूर शहर अध्यक्ष दिनेशसिंग राजपूत, नगरसेवक राजेश त्रिभुवन, शैलेश चव्हाण, भाजपा व्यापारी आघाडीचे शैलेश पोंदे, विनय संचेती, संदिप पवार, सन्मितसिंग खनिजो, महेंद्र काटकर, गिरीश चापानेरकर, आदी उपस्थित होते.

चित्राताई वाघ यांनी घटनास्थळी जाऊन परिवाराची भेट घेत त्यांचे सांत्वन केले व प्रशासकीय यंत्रणेकडून होणाऱ्या तपासाची व झालेल्या दिरंगाईची माहिती घेत लवकरात लवकर प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा विनंती वजा इशारा पोलीस प्रशासनास दिला. त्यानंतर त्यांनी सुवर्णकार समाजाचे पौराणिक श्री.कालभैरवनाथ मंदिर, वैजापूर येथे सदिच्छा भेट दिली. त्या प्रसंगी सर्व सुवर्णकार समाज उपस्थित होता.