अंबड येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार, बळाचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मराठा आरक्षण आंदोलना दरम्यानच्या लाठीमाराची घटना दुर्दैवी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन

जालना ,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  “मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीने लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे  प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना दिला.

उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील मराठा आंदोलनाने लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेऊन, कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानेच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्या सोबत आहे. अंबड येथील घटनेतील दोषी पोलिसांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलक आणि राज्यातील नागरिकांना केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका; नागरिकांनी शांतता राखावी- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दि.१ : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात असल्याचे सांगत मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका राज्य सरकारची आहे. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या घटनेची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. मी या आंदोलनाच्या नेत्यांशी देखील संवाद साधला होता. त्यांच्या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर कार्यवाही सुरू असल्याचे सांगतानाच त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील केली होती. मात्र आंदोलनावर ते ठाम राहिल्याने त्यांची प्रकृती खालावत होती. आज जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक त्यांना भेटायला गेले होते. त्यांची प्रकृती पाहून त्यांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी विनंती देखील त्यांनी केली होती.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका राज्य शासनाची आहे. या समाजाला न्याय देण्याची भावना आणि भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; वाद आणखी पेटणार

मुंबई :– जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने समाजाचा अंत पाहू नये. या गंभीर प्रश्नावर केवळ वेळकाढूपणा होत असल्याने समाज संतप्त आहे. बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येणार नाही. त्याऐवजी मराठा आरक्षण कसे देणार, याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि ठोस पावले उचलावीत. नेमके हेच केले जात नसल्याने मराठा समाजातील आक्रोश तीव्र होतो आहे असा हल्लाबोल माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर केला.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंबड तालुक्यातील सराटी अंतरवाली येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रुधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या व्हिडीओतून बळाचा अतिरेक स्पष्टपणे दिसून येतो. मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी व अन्य न्यायालयीन प्रकरणातील ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता आहे. याकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही केंद्र व राज्य सरकार काहीच करत नसल्याने मराठा समाजावर आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ ओढवली आहे असा आरोप अशोक चव्हाणांनी केला.

मराठा आरक्षणाबाबत सर्वच राजकीय पक्षांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आरक्षणाची मागणी लावून धरणाऱ्या माझ्या भावा बहिणींना लाठया काठया खाण्याची वेळ या सरकारने आणली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर सरकारने केलेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करतो. मराठा आरक्षण कसे देणार हे तातडीने स्पष्ट करा नाहीतर असा उद्रेक होतच राहणार असा इशारा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिला आहे. त्याचसोबत आरक्षणाची मागणी आपण ज्या शांततामय आणि कायदेशीर मार्गाने लावून धरली होती तशीच ती नेटाने लावून धरु त्यात आपण तसूभरही मागे हटणार नाही. मराठा आरक्षणाचे आंदोलन आपल्याला शांततेनेच करायचे आहे . या आंदोलनाला वावगे वळण लागता कामा नये असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.