अंमली पदार्थ विरोधात पोलिसांनी धडकपणे कारवाई करावी – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

  • गांजाची लागवड करणे बेकायदेशीर
  • शाळा, महाविद्यालयस्तरावर अंमली पदार्थविरोधात जनजागृती करावी
  • मेडिकल स्टोअरवरील गुंगीकारक औषधांचा साठा तपासावा

जालना ,२४ सप्टेंबर /प्रतिनिधी :-आपल्या परिसरात जर अंमली पदार्थांची विक्री, वाहतुक, वापर अथवा साठवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी त्याबाबतची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला तात्काळ उपलब्ध करुन द्यावी. तर ग्रामीण भागात अंमली पदार्थ वापराबाबत किंवा शेतात गांजा या पिकाची लागवड केल्याचे आढळल्यास  सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी जवळच्या पोलिस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली.

अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक नुकतीच  जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, या प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त वर्षा महाजन, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश खाडे, रेल्वेच्या पार्सल कार्यालयाचे प्रशांत स्वामी, सामान्य रुग्णालयाचे डॉ. संजय मेश्राम, शिक्षणाधिकारी मंगला धुपे आदी उपस्थित होते.

   जिल्हाधिकारी  डॉ. पांचाळ  म्हणाले की,  अंमली पदार्थ शरीरास अत्यंत घातक आहेत. विशेषत: तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी  पोलिस प्रशासनाने जिल्हयात अंमली पदार्थांच्या विरोधात धडकपणे कार्यवाई करावी. कृषी विभागाने शेतात गांजा सारख्या अंमली पिकांची लागवड केल्याचे आढळल्यास पोलीसांना याबाबत माहिती द्यावी. पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाने गांजा लागवडी विरोधात अलीकडे मोठया प्रमाणात कारवाई केली, ही बाब कौतुकस्पद असून जिल्ह्यात अंमली पदार्थ प्रकरण उघडकीस आल्यास वेळोवेळी कठोर कारवाई करुन अंमली पदार्थांची वाहतूक, विक्री तसेच साठवणूक करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी.

कुरिअर सेवा, खाजगी ट्रॅव्हल्स यांच्यामार्फत अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक  होण्याची शक्यता असल्याने  त्यांची अचानक तपासणी करावी. औषध विक्रेत्यांनी  गुंगीकारक औषधांची डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात विक्री करु नये. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेडीकल स्टोअरवरील गुंगीकारक औषधांचा साठा वेळोवेळी तपासून तो अधिकृतरित्या नियमाप्रमाणे खरेदी केला आहे का, याची काटेकोर तपासणी करावी. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी  अंमली  पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करावी तर अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावेत आणि या कार्यक्रमात अंमली पदार्थांसारख्या नशेच्या आहारी जाणार नाही याबाबतची शपथ विद्यार्थ्यांना प्राधान्याने द्यावी. संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.    

दरम्यान, आपल्या परिसरात अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक, वापर अथवा साठवणूक  केल्याचे आढळल्यास  किंवा गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी जालना पोलिस नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 02482-225100 किंवा ई-मेल पत्ता [email protected] वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिस विभागाने कळविले आहे.