कागदावर ठरल्याप्रमाणे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, सरकारला वाढवून वेळ मिळणार नाही – मनोज जरांगे-पाटील

मराठा आंदोलनाची पुढील दिशा आता ‘या’ तारखेला ठरवणार!

जालना,१७ डिसेंबर/ प्रतिनिधी :-मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यातील मराठा समाजातील मान्यवरांची एक बैठक जालन्यातील अंतरवाली सराटी गावात बोलावली. या बैठकीत सरकारला २४ डिसेंबरनंतर जास्तीचा वेळ देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. तसंच राज्यभरात सापडलेल्या ५४ लाख कुणबी नोंदींच्या आधारावर राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी जरागे यांनी केली आहे.त्याआधी २३ डिसेंबरला जरांगे बीड येथे जाहीर सभा घेऊन मराठा आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.

यावेळी बोलताना ते म्हणाले, आपलं आरक्षण ओबीसींकडे आहे. त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचं आहे. त्यांचं आपल्याला एक इंचही नको, परंतु आपलं ते का खात आहेत? हा प्रश्न आहे. धनगर आणि वंजारा समाजाला स्वतंत्र आरक्षण असल्याने यात त्यांचा काहीच प्रश्न नाही. मिळालेल्या कुणबी नोंदींच्या आधारावर अहवाल बनवून आरक्षण देण्याचा सरकाराचा शब्द आहे. राज्याच्या सगळ्या मोठ्या कायदेतज्ज्ञांनी आम्हाला लिहून दिलं आहे आणि सरकारने ते मान्य केलं आहे. त्यांच्याच शब्दावर सरकारने आरक्षण देण्याची गरज आहे. आता आपल्याला गुलालच घ्यायचा आहे.

जे कागदावर ठरलं आहे, त्या आधारावर मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या. कारण हे शब्द तुमचे आणि तुमच्या तज्ज्ञांचे आहेत. सरकार आरक्षण देईल, यात मराठ्यांना शंका नाही. परंतु आपल्याला सावध रहायचं आहे, त्यामुळे आजची बैठक बोलावली असल्याचं जरांगे म्हणाले. सरकारला या बैठकीच्या निमित्ताने विनंती आहे. त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्याव, जास्तीचा वेळ मिळणार नाही. ५४ लाख नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, अनेकांचे प्रमाणपत्र थांबवल्याची माहिती आहे. ज्यांच्या नोंदी सापडेल्या त्यांच्या घरी तलाठ्यांना पाठवून प्रमाणपत्र द्या, अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली.

बीडमध्ये २३ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक, बीड बायपास मांजरसुंबा रोड येथे मराठा समाजाची सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, तब्बल ५० एकरमध्ये ही सभा होणार आहे. या सभेसाठी ४० एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. या सभेच्या नियोजनासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बैठका देखील झाल्या आहेत. मात्र, आता आंदोलनाची दिशा याच सभेत ठरवली जाणार असल्याने या सभेला अधिक महत्व प्राप्त झाले आहेत.

बॅनरवर महाराजांपेक्षा माझा फोटो मोठा का..?काढा तो बॅनर…राजेंपेक्षा कोणीच मोठा नाही

अंतरवाली सराटी येथे रविवारी मराठा समाजाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील २५ ते ३० हजार मराठा बांधव सहभागी झाले होते. बैठकीत पुढील ठराव सर्वानुमते पास झाले.बैठकीचे नियोजन करणाऱ्या समन्वयकांनी बैठक स्थळी लावलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज याच्या प्रतिमेपेक्षा मनोज जरांगे यांची प्रतिमा मोठी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्वतः जरांगे यांनी समन्वयकांना खडसावून बॅनरवर महाराजांपेक्षा माझा फोटो मोठा का..?काढा तो बॅनर…. राजेंपेक्षा कोणीच मोठा नाही असा सज्जड दम देऊन तो बॅनर काढायला लावला, त्यानंतरच बैठकीला सुरुवात झाली.

या बैठकीत मराठ्यांचा ओबीसीत समावेश झाल्या मुळे SC, ST आणि VJ-NT बांधवांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही(वेगळा प्रवर्ग असल्यामुळे). काहीजण म्हणतात ओबीसींवर अन्याय होईल. परंतु मराठ्यांच्या ५४ लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत, अजूनही सापडतील. त्यामुळे मराठे ओबीसीतच आहेत.

न्या. शिंदे समिती २४ डिसेंबरला रोजी सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे. त्या ५४ लाख नोंदींचा आधार घेऊन सरकारने सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा पास करावा. काही तालुक्यातील मुजोर अधिकारी कुणबी नोंदी नाहीत असे सांगत आहेत(उदा. नायगाव, नांदेड). मराठ्यांनी वैयक्तिक शोध घेतला तेव्हा प्रचंड नोंदी सापडल्या. सरकारने न्या. शिंदे समितीची मुदत वाढवावी व २४ डिसेंबरच्या पुढेही समितीचे काम सुरुच ठेवावे.

सरकारने कोपर्डीचा खटला लवकर निकाली काढावा

राज्यातील जवळपास १३ हजार मराठा विद्यार्थ्यांची नोकरीत निवड झाली आहे. परंतु त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत. त्या नियुक्त्या लवकरात लवकर द्याव्यात.मराठ्यांनी बांध टोकरने बंद करा, भावकीतील भांडणे मिटवा, एकमेकांना सहकार्य करा, लग्न साधे करा. दारू पिऊ नका. जगातील सर्वात प्रगत जात मराठ्यांची असेल.अंतरवाली सराटी येथील उपोषण सोडवताना सरकारचे प्रतिनिधी आणि आपल्यात जे मुद्दे ठरले होते, त्यावर १८ तारखेला मुख्यमंत्री स्वतः विधिमंडळात उत्तर देणार आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून मराठा आरक्षणावर सकारात्मक निर्णय येईल अशी मराठा समाजाला अपेक्षा आहे.

“२५ डिसेंबरला मी पुन्हा आमरण उपोषण सुरु करतो” असे जरांगे पाटील म्हणताच, बैठकीत गोंधळ झाला व पुन्हा आमरण उपोषण नको अशी विनंती समाज बांधवांनी केली. ती पाटलांनी ऐकली व उपोषणाचा निर्णय मागे घेतला. २४ डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा. २३ डिसेंबरच्या बीडच्या सभेत जाहीर केला जाणार. २४ डिसेंबर नंतरचे आंदोलन सरकारला परवडणारे नसेल.आंदोलन शांततेत होईल परंतु पूर्ण तयारीनिशी कोटीने मराठे सहभागी होतील आणि आरक्षणाशिवाय माघार घेतली जाणार नाही.आदी मुद्यावर चर्चा झाली.