दौलताबाद महावितरण शाखेतील १० जणांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल

आकडे टाकून चोरली १ लाख ६७ हजारांची वीज
छत्रपती संभाजीनगर,२६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- 
महावितरणच्या दौलताबाद शाखेतील दहा जणांवर १ लाख ६७ हजार १२१ रुपयांची विद्युत चोरी केल्याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या धडक कारवाईमुळे वीजचोरांत एकच खळबळ उडाली आहे. 
     दौलताबाद शाखेचे सहायक अभियंता धनंजय बाणेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी जून व जुलै महिन्यामध्ये वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबविली. विविध गावांत घरगुती व औद्योगिक वापरासाठी ग्राहकांनी महावितरणच्या लघुदाब विद्युत वाहिनीवर आकडे टाकून १ लाख ६७ हजार १२१ रुपयांची चोरी केल्याचे मोहिमेत उघड झाले होते. सहायक अभियंता बाणेदार यांच्या फिर्यादीवरून वीजचोरी करणाऱ्या दहा जणांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये छावणी पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींमध्ये अब्दीमंडी लाल माती येथील अन्सार मेहमूद पठाण,आसमा बेगम साकीर शेख, शरणापूर येथील बाबासाहेब पांडुरंग कान्हेरे, फकीरराव देवराव कान्हेरे, कैलास कचरू भवर,  लिंबा सांगळे करोडी येथील बाबासाहेब सोनवणे, साजापूर येथील बजरंग मुरलीधर दगडघाटे, फिरोज पठाण जमील व मोमीनपुरा दौलताबाद येथील हजरा बेगम अब्दुल कादर यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.