आठ महिन्यांत वीजचोरीची 2899 प्रकरणे उघडकीस,237 जणांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद,२१ डिसेंबर /प्रतिनिधी:- महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलात गेल्या आठ महिन्यांत वीजचोरीची 2899 प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात ग्राहकांनी 3 कोटी 62 लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. या  सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 237 प्रकरणांत वीजचोरी करणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

            महावितरणतर्फे औरंगाबाद व जालना जिल्ह्यात सातत्याने वीजचोरीविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. यात आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांसह मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. औरंगाबाद परिमंडलात एप्रिल 2021 ते नोव्हेंबर-2021 या आठ महिन्यांत मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. यात औरंगाबाद शहर मंडलात 940 औरंगाबाद ग्रामीण मंडलात 890 तर जालना मंडलात वीजचोरीची 1069 प्रकरणे उघडकीस आली. एकूण 2899 प्रकरणांत ग्राहकांना 3 कोटी 62 लाख रुपयांच्या वीजचोरीची बिले देण्यात आली. यातील 521 ग्राहकांकडून वीजचोरीच्या बिलांची 1 कोटी 10 लाख रुपयांची रक्कम महावितरणने वसूल केली आहे. ज्या ग्राहकांनी वीजचोरीची बिले भरलेली नाहीत, त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया महावितरणतर्फे सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत औरंगाबाद शहर मंडलात 112 तर जालना मंडलात 125 प्रकरणांत वीजचोरांवर पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वीजचोरीविरोधातील धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांनी अधिकृत जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.