लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी प्रसिद्ध लेखक जयदेव डोळे यांचे व्याख्यान

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला

नवी दिल्ली,३० जुलै /प्रतिनिधी :- लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेच्या उत्तरार्धात १ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध लेखक व वक्ते जयदेव डोळे यांचे ‘अण्णाभाऊ साठे : साम्यवादी, महाराष्ट्रवादी’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु झाली आहे  व पूर्वाधात ४४ व्याख्यान झाले. या व्याख्यानमालेचा उत्तरार्ध सुरु होत असून रविवार  १ ऑगस्ट  रोजी  लेखक व वक्ते जयदेव डोळे हे सकाळी  ११.०० वाजता व्याख्यानमालेचे ४५ वे पुष्प गुंफणार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित या विशेष या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

जयदेव डोळे यांच्याविषयी…

जयदेव डोळे हे मराठीतले वैचारिक लिखाण करणारे प्रसिद्ध लेखक व वक्ते आहेत. पुणे आणि औरंगाबाद या दोन्ही शहरांत त्यांनी एकूण १८ वर्षे पत्रकारिता केली. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे त्यांनी एकूण २० वर्षे पत्रकारिता विषयाचे अध्यापन केले आहे.

श्री. डोळे यांची एकूण ९ पुस्तके प्रकाशित असून ‘अ लिव्हिंग फेथ (अनुवादित,मूळ इंग्रजी लेखक-असगर अली इंजिनिअर), आरएसएस, खबर, ‘जॉर्ज नेता, साथी, मित्र’, प्राध्यापक लिमिटेड (अनुभवकथन), लालूप्रसाद यादव (अनुवादित चरित्र, मूळ हिंदी लेखक – संकर्षण यादव), विरु(ल)द्ध : महाराष्ट्रीय संस्कृतीवर एक क्रिटिक (कादंबरी), समाचार-अर्थात प्रसारमाध्यमांची झाडाझडती (सामाजिक) आणि  हाल (ललित) या पुस्तकांचा त्यात समावेश आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि औरंगाबाद , महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांची उत्कृष्ट साहित्य निर्मितीची पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘नरहर कुरुंदकर वाड्मय पुरस्कार’ आणि लोकसाहित्यिक भास्करराव जाधव यांच्या नावाचा ‘कॉम्रेड जाधव स्मृतिपुरस्कार’ही त्यांना मिळाला आहे. २०१७ मध्ये प्राध्यापकपदाहून निवृत्त झाल्यानंतर श्री. डोळे हे लेखन,व्याख्यान करतात.

रविवारी समाज माध्यमांद्वारे प्रसारण

रविवार, १ ऑगस्ट 2021 रोजी  सकाळी 11 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.