आरोपीच्‍या खिशातून पडलेल्या मोबाइल आधारे तब्बल महिन्‍याभरानंतर दोघांना अटक 

औरंगाबाद,११ डिसेंबर / प्रतिनिधी :-गावाला गेलेले डॉक्टर दांम्पत्‍य घरी परतले असता चोरी करण्‍यासाठी अगोदरच घरात शिरलेल्या चोरट्यांनी त्‍यांना मारहाण करुन घरातील सोन्‍याच्‍या दागिन्‍यांसह सिंगापुरचे चलन आणि सात हजरांची रोख रक्कम असा सुमारे ९५ हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना १३ नोव्‍हेंबर रोजी शहरानुरवाडी परिसरातील यशोधन बंगलो येथे घडली होती.

विशेष म्हणजे डॉ‍क्टर दांम्पत्‍याला मारहाण करित असताना आरोपीच्‍या खिशातून पडलेल्या मोबाइल आधारे तब्बल महिन्‍याभरानंतर गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने वरील दोघा आरोपींच्‍या दिल्ली आणि मध्‍यप्रदेशातून मुसक्या आवळल्या. ही धाडसी चोरी शहरात राहणार्या एका साथीदाराच्‍या मदतीने केल्याचे आरोपींनी कबुल केले आहे.

मोहम्मद नासीर हुसैन मोहमंद आरीफ (२९, रा. मदनपुर, खादर एक्सटेंशन सरीता विहार, दक्षिण दिल्ली), रुपेश इंद्रपाल नागले (२६, रा. हिवरखेडी ता.जि. बैतुल, ह.मु. विवेकानंद वार्ड बग्गुढाण, बैतुल मध्‍यप्रदेश) अशी अटक अरोपींची नावे आहेत. तर विजय कृपाचंद परदेशी (रा. गजानन महाराज मंदीर रोड, गारखेडा परिसर) असे पसार आरोपीचे नाव आहे. अटक आरोपींविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्‍यात दोन गुन्‍हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

प्रकरणात भूलतज्ज्ञ डॉ. प्रसाद चंद्रकांत देशपांडे (४७, रा. यशोधन बंगलो, केशवनगर, शहानुरवाडी) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, डॉ. देशपांडे हे नेत्रतज्ज्ञ पत्‍नी व मुलगी असे तिघे १३ नोव्हेंबर रोजी मित्र नीलेश महाजन यांच्या परिवारासह मालवणला फिरण्यासाठी गेले होते. १७ नोव्हेंबरला रात्री ते घरी परतले. घराचा दरवाजा उघडून प्रवेश करताच त्यांच्या पत्नीला खिडक्यांचे पडदे हलताना दिसले. तसेच वरच्या मजल्यावरून कोणीतरी बोलत असल्याचा संशय आल्याने त्यांनी डॉ. प्रसाद यांना आवाज दिला. डॉ. प्रसाद पायऱ्या चढून वर जाण्याच्या प्रयत्नात असतानाच दोघा चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर एकाने लोखंडी टॉमीने कपाळावर वार केले. त्यानंतर पोबारा केला. झटापटीत चोरांपैकी एकाचा मोबाइल आणि लोखंडी टॉमी तेथेच राहिली. चोरट्यांनी घराच्‍या मागील लोखंडी गेट व दुसरा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. प्रकरणात जवाहरनगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

वरील दोघा आरोपींना आज हजर करण्‍यात आले असता, आरोपींच्‍या साथीदाराला अटक करायची आहे. गुन्‍ह्यातील मुद्देमाल हस्‍तगत करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सराकरी वकील निता किर्तीकर यांनी न्‍यायालयाकडे केली. विनंती मान्‍य करुन अटक आरोपींना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी आर.व्हि. सपाटे यांनी रविवारी दि.११ दिले.