घरोघरी जाऊन मतदार पडताळणी कार्यक्रम 31 ऑगस्ट अखेर पूर्ण करा- डॉ.अरविंद लोखंडे यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर,२६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून या निमित्ताने घरोघरी भेटी देऊन राबवावयाचा ‘एच टू एच’, हा कार्यक्रम दि.31 पर्यंत शंभर टक्के पूर्ण करावा,असे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी दिले.
मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे 109 पूर्व छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील बीएलओ व सर्व मतदान पर्यवेक्षक यांची बैठक अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.25) घेण्यात आली.
या बैठकीत विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. तसेच घरोघरी भेटी देऊन राबवावयाचा ‘एच टू एच’, हा कार्यक्रम दि.31 पर्यंत शंभर टक्के पूर्ण करावा,असे निर्देश डॉ. लोखंडे यांनी दिले. फॉर्म नमुना सहा नंबर, सात नंबर, आठ नंबर व आठ अ मतदाराकडून भरून घेणे, मतदार उपलब्ध नसल्यास पंचनामा कसा करावा याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. अठरा वर्षे पूर्ण झालेले नवमतदार, लग्न झालेल्या महिलांचे नवीन नावानुसार फॉर्म भरणे, दिव्यांग व्यक्ती, 80 पेक्षा जास्त वर्ष वय असलेले मतदार अशा विविध घटकांची नाव नोंदणी कशी करावी, तसेच मयत, स्थलांतरीत इतर घटकांची नाव वगळणी कशी करावी, यासंदर्भात मार्गदर्शन केले. ज्यांची कामे उत्कृष्ट झाली आहेत अशा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार डॉ. लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवडणूक कामकाजा बाबतचे आदेश व मुख्य सचिव यांचे निर्देश याबाबत मतदार नोंदणी अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 109 पूर्व तथा तहसिलदार श्रीमती पल्लवी लिंगदे यांनी केले.