महसूल सप्ताह:लोकोपयोगी उपक्रम,सेवापुस्तक अद्यावतीकरण,आरोग्य शिबिराचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :–महसूल सप्ताहानिमित्त आजअधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्यावतीकरण करणे, तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

आरोग्य शिबिर

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य तपासणी  शिबिरात जिल्‍हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मिना यांनी स्वतः आरोग्‍य तपासणी करुन शिबिराची सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील एकूण 197 अधिकारी व कर्मचारी यांची रक्‍तदाब मधुमेह थायरॉईड हिमोल्‍गोबीन इ. अत्यावश्यक तपासण्या करण्‍यात आल्‍या.

सेवापुस्तक अद्यावतीकरण

महसूल कर्मचाऱ्यांचे आश्‍वासीत प्रगती योजना, जिल्‍हा पदोन्‍नती समीतीची बैठक, सेवा पुस्‍तक अद्यावतीकरण, स्‍थायीत्‍व प्रमाणपत्र प्रदान करणे इ. उपक्रम राबविण्यात आले. जिल्‍हाधिकारी आस्तिककुमार पाण्‍डेय, अप्‍पर जिल्‍हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्‍हाधिकारी जनार्धन विधाते, उपजिल्‍हाधिकारी अप्‍पासाहेब शिंदे , प्रभोदय मुळे, महेश सागर आदी अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डॉ.दयानंद मोतीपवळे, डॉ. किर्ती तांदळे व त्यांचे पथक आरोग्य तपासणीसाठी उपस्थित होते. 

पाटोदा येथे जनसंवाद

    मौजे पाटोदा (ता.जि.छत्रपती संभाजीनगर) येथे ‘जन संवाद’ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात नागरिकांना ई पीक पहाणीची माहिती देण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फेरफार अदालत घेऊन 48 लोकांना फेरफार व सातबारा वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य शिबिर व वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. नायब तहासिलदार देवडे, मंडळ अधिकारी म्हस्के विभाग पंढरपूर, वानखरे, लोळगे, कांचनवाडी तलाठी साळवे, स्वप्नील शेळके ,भरत दुतोंडे,जाधव, विनोद मुळे, मधुकर मुळे, सरपंच पवार अप्पा, उपसरपंच, ग्रामसेवक,सर्व सदस्य पाटोदा, मुख्याध्यापक पाटोदा व ग्रामस्थ उपस्थित होते.

सिल्लोड येथे फेरफार अदालत

सिल्लोड येथे तहसिलदार रमेश जसवंत, नायब तहसिलदार प्रभु गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंवाद  कार्यक्रम आयोजित करुन फेरफार अदालत घेण्यात आली. त्यात 48 नागरिकांनी केलेल्या विविध तक्रारींचा निपटारा जागेवरच करण्यात आला. अन्य तक्रारींवर मार्गदर्शन करण्यात आले.  तसेच सर्व मंडळ मुख्यालयी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले.

वैजापूर तालुक्यात विविध उपक्रम

वैजापूर तालुक्यात शिऊर  मंडळ, लासूरगाव, वैजापूर, महालगाव,  खंडाळा  येथे  फेरफार अदालत  घेण्यात आली. तसेच वृक्षरोपण व सातबारा वाटप  करण्यात आले.

कन्नड तालुक्यात संवाद सत्र

 करंजखेड येथे महसूल सप्ताह निमित्त आदिवासी नागरिकांशी संवाद व प्रमाणपत्र वाटप, सातबारा वाटप, शेतकरी व युवकांशी संवाद साधण्यात आला.तहसिलदार विद्याचरण कडवकर, नायब तहसिलदार मोनाली सोनवणे, मंडळ अधिकारी एस. बी. देशपांडे, तलाठी आर. एस. देशमुख, तलाठी एस. जांबुतकर, तलाठी मोहिते आप्पा, सरपंच, ग्रामपंचायत, सदस्य, शेतकरी, आदिवासी बांधव, व नागरिकांची उपस्थित होते.

पैठण तालुक्यात प्रमाणपत्र वाटप

तालुक्यातील पाचोड येथे उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ व तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पाचोड बु. येथील महाविद्यालय विद्याथी संवाद करून महसूल कामकाज विषयी माहिती देण्यात आली. मतदार नोंदणी,ई पिक पाहणी, फेरफार अदालतीत 28 प्रकरणांमध्ये फेरफार मंजूरी, संजय गांधी व श्रावणबाळ योजनाचे 33 प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच ‘एक हात मदतीचा’ याअंतर्गत मौजे मुरमा येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबतील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन करुन शासकीय मदत देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. मुरमा येथील मतदान केंद्र ब अंगणवाडी केंद्रास भेट देऊन पाहणी केली. गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने सप्ताहभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ व तहसीलदार सारंग चव्हाण यांनी केले.